गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदी अश्विनी धात्रक विराजमान

By admin | Published: September 19, 2015 01:57 AM2015-09-19T01:57:01+5:302015-09-19T01:57:01+5:30

येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष म्हणून डॉ. अश्विनी धात्रक (यादव) यांच्या नावाची शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सभेत घोषणा करण्यात आली.

As the head of Gadchiroli city, Ashwini Dhatrak, | गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदी अश्विनी धात्रक विराजमान

गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदी अश्विनी धात्रक विराजमान

Next

अविरोध निवड : पालिकेतील सत्ता संघर्षाला पूर्णविराम
गडचिरोली : येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष म्हणून डॉ. अश्विनी धात्रक (यादव) यांच्या नावाची शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सभेत घोषणा करण्यात आली. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डॉ. अश्विनी धात्रक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची शुक्रवारी अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
यापूर्वीच्या नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी ३ सप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली. त्यानुसार ११ सप्टेंबरला मुख्याधिकाऱ्यांकडे नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करावयाचे होते. मात्र नगरसेविका डॉ.अश्विनी धात्रक यांचा एकमेव अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला. त्यामुळे डॉ.अश्विनी धात्रक यांच्या नावावर तेव्हाच शिक्कामोर्तब झाले होते. परंतु निवडणूक विभागाच्या प्रकियेनुसार शुक्रवारी विशेष सभा बोलाविण्यात आली. या सभेत २५ नगरसेवकांपैकी १८ नगरसेवक उपस्थित होते. पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी प्रक्रियेचे वाचन करुन डॉ. अश्विनी धात्रक (यादव) यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्षपदासाठी आल्याची माहिती उपस्थित नगरसेवकांना दिली. त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष म्हणून डॉ.अश्विनी धात्रक यांचे नाव जाहीर केले. यावेळी नगर पालिकेचे गट नेते प्रा.राजेश कात्रटवार, नगरसेवक सुरेश पोरेड्डीवार, विजय गोरडवार, रमेश चौधरी, भूपेश कुळमेथे, संजय मेश्राम, संध्या उईके, मीनल चिमूरकर, नंदू कायरकर, बेबीताई चिचघरे, शारदा दामले, सुषमा राऊत, लता मुरकुटे, अजय भांडेकर, अ‍ॅड. प्रशांत उर्फ बाळू आखाडे व नामनिर्देशीत सदस्य नितीन कामडी उपस्थित होते. तसेच विशेष सभेला पालिकेचे मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे व कर्मचारी बी. एम. शेंडे उपस्थित होते. सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांनी डॉ.अश्विनी धात्रक यांचे अभिनंदन करुन फटाक्यांच्या आतिषबाजीने आनंद व्यक्त केला.
विशेष म्हणजे, या सभेला आनंद शृंगारपवार, माजी नगराध्यक्ष निर्मला मडके, सचिन बोबाटे, माधुरी खोब्रागडे, पुष्पा कुमरे, चेतना ठाकरे व नामनिर्देशीत सदस्य श्रीकांत भृगूवार हे नगरसेवक अनुपस्थित होते. यावेळी गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (स्थानिक प्रतिनिधी)
धात्रक यांनी पदभार स्वीकारला
गडचिरोली नगर पालिकेच्या नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक (यादव) यांनी शुक्रवारी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नगर पालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगिण विकास गतीने करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

Web Title: As the head of Gadchiroli city, Ashwini Dhatrak,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.