घरी एक हजार रुपये द्या; अन् बारावीत बिनधास्त कॉपी करा; खळबळजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:00 AM2023-03-09T11:00:20+5:302023-03-09T11:01:14+5:30
समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल
कूरखेडा (गडचिरोली) : शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्र प्रमुखाने बारावीच्या परीक्षेत काॅपी करू देण्यासाठी चार दिवसांपूर्वी सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रूपये घेतले. याच विद्यार्थ्यांनी पैसे देतानाचा व्हिडीओ काढून ताे बुधवारी समाजमाध्यमांवर व्हायरल केला. यामुळे गडचिराेली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
सध्या परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेला व्यक्ती तिथेच कनिष्ट महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. बारावीच्या परीक्षेत काॅपी करू देण्यासाठी त्याने सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेतले. या विद्यार्थ्यांना त्याने घरी बाेलावून घेतले. आपल्या घरीच ताे पैसे घेत असताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी त्याला पैसे दिले त्यांचे नाव व माेबाइल नंबर ताे लिहून घेत आहे. पैसे देतेवेळी सात ते आठ विद्यार्थी हाेते. त्यामुळे त्यांच्यापैकी एक विद्यार्थी याबाबतचा व्हिडीओ काढत असल्याची भणकसुद्धा त्याला लागली नाही.
व्हिडीओ काढल्यानंतर त्याची माहिती संबंधित केंद्रप्रमुखाला देण्यात आली. हे कळताच केंद्रप्रमुखाच्या पायाखालची वाळू सरकली. त्या विद्यार्थ्याला घरी बाेलावून त्याला काही पैसे देऊन व्हिडीओ डिलिट करण्यास सांगितले. विद्यार्थ्याने पैसे घेतले, मात्र ताेपर्यंत हा व्हिडीओ त्याच्या मित्रांकडे व्हायरल झाला हाेता. बुधवारी ताे माेठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला.
या व्हिडीओची शहानिशा करून कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागावर पालकांचा दबाव वाढण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्याच्याकडून परीक्षा केंद्रप्रमुख हे पद काढण्यात आले. शिक्षण विभागाचे अधिकारी व कुरखेडा पाेलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणाची अजूनही काेणत्याही व्यक्तीने पाेलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली नाही. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणे ही बाब शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाने शिकविले व स्वत:ला त्यांचा गुरू मानताे त्याच विद्यार्थ्यांकडून काॅपी करण्यासाठी पैसे घेणे ही बाब अतिशय लांच्छनास्पद आहे. शिक्षण विभागाने याची दखल घेऊन या प्रकरणाची तक्रार पाेलिस ठाण्यामध्ये करावी अशी मागणी हाेत आहे.
‘मै कुछ नही करूंगा’
पैसे घेऊन झाल्यानंतर संबंधित प्राध्यापक ‘आपके लेव्हल पर कराे, मै कुछ नही करूंगा’ असे शेवटी म्हणत आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून ५०० रुपयांच्या नाेट घेताना व त्यांची नावे लिहिताना ताे स्पष्ट दिसून येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने पाेलिस ठाण्यामध्ये तक्रार करावी, अशी मागणी आहे.