आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची डोकेदुखी
By admin | Published: July 21, 2016 01:20 AM2016-07-21T01:20:45+5:302016-07-21T01:20:45+5:30
राज्याच्या समाजकल्याण आयुक्तालयाने गेल्या तीन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली आहे.
लिंक फेलचा फटका : समाजकल्याण विभाग गडचिरोलीत झाला हतबल
गडचिरोली : राज्याच्या समाजकल्याण आयुक्तालयाने गेल्या तीन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा पूर्णत: बोजवारा उडाला होता. आताही इंटरनेट कनेक्टिव्हीटीमध्ये गती नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशाचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. एकूणच जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याणच्या वसतिगृहाची सदर आॅनलाईन प्रक्रिया प्रचंड डोकेदुखी ठरली आहे.
समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्या अधिनस्त जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७ वसतिगृह आहेत. यापैकी ५ वसतिगृहाची प्रवेश क्षमता १०० व २ वसतिगृहाची विद्यार्थी प्रवेश क्षमता प्रत्येकी ७५ आहे. समाजकल्याणच्या सातही वसतिगृहात एकूण ६५० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने आरमोरी, अहेरी, चामोर्शी येथे प्रत्येकी १ व गडचिरोली शहरात ४ वसतिगृह आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात विज्ञान शाखा व उच्च शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळे गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना निवासी राहून शिक्षण घेता यावे, या उद्देशाने राज्य सरकारने समाजकल्याण विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. तीन वर्षांपूर्वी या वसतिगृहासाठी जिल्हास्तरावरून थेट प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र सदर प्रवेश प्रक्रियेत अनेक त्रूट्या आढळून आल्या. तसेच काही जणांनी शासनस्तरावर आक्षेपही घेतले. त्यामुळे राज्य सरकारने सन २०१४-१५ पासून वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी पुण्यावरूनच जाहीर केली जाते. त्यानंतर समाजकल्याण विभागामार्फत थेट वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. (स्थानिक प्रतिनिधी)
कायम निवासी व्यवस्थेअभावी विद्यार्थ्यांची पंचाईत
मागासवर्गीय प्रवर्गातील अनेक गुणवंत, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांनी गडचिरोली शहराच्या नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेला इयत्ता ११ वीत प्रवेश घेतला आहे. काही विद्यार्थी पदवीच्या शिक्षणाला प्रवेश घेतले आहे. मात्र या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने अनेक विद्यार्थी नातेवाईकांच्या घरी राहून सध्या शिक्षण घेत आहेत. तर ऐपत नसतानाही काही विद्यार्थी भाड्याची खोली करून समुहाने राहत आहेत. सदर प्रवेशित विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याकरिता धावपळ करीत आहेत. वसतिगृह प्रवेशाच्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने हुशार व गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.
नव्या वसतिगृहाला अधीक्षिका व लिपिक हवे
राज्य शासनाने गतवर्षी मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी गडचिरोली येथे १०० प्रवेश क्षमतेच्या नव्या वसतिगृहास मंजुरी प्रदान केली. गतवर्षी मार्च महिन्यात नव्या वसतिगृहाला भाडे तत्त्वावरील इमारत विसापूर मार्गावर उपलब्ध झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्रापासून या ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी या वसतिगृहात शिपाई व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र या वसतिगृहासाठी शासनाने स्वतंत्र अधीक्षक व लिपिकाचे पद मंजूर केले नाही. त्यामुळे या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचा कारभार गडचिरोली येथील वसतिगृहाच्या एका अधीक्षिकांकडे सोपविण्यात आला आहे. येथे स्वतंत्र अधीक्षिका व लिपिकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे.