अज्ञात वाहनाने घेतला मुख्याध्यापकाचा बळी; दुचाकीवरील सोबतचे शिक्षक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 06:26 PM2022-04-25T18:26:41+5:302022-04-25T18:28:24+5:30
हा अपघात सोमवारी मिरकल गावाजवळ घडला.
आलापल्ली (गडचिरोली) : दुचाकीवरून जाणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुख्याध्यापक किशोर रमय्या मद्देर्लावार (५३ वर्ष), रा. नागेपल्ली यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेले शिक्षक रमेश गौरकार (५० वर्षे) हे जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी मिरकल गावाजवळ घडला.
प्राप्त माहितीनुसार, मन्नेराजाराम येथील धर्मराव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक असलेले मद्देर्लावार आणि शिक्षक गौरकार हे आलापल्लीवरून मन्नेराजाराम येथील शाळेकडे दुचाकीने (एमएच ३४, आर २०९४) जात होते. मिरकलजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी कोणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याचे बघून धडक देणाऱ्या वाहनाने तेथून पोबारा केला. या अपघातात गणित विषयाचे शिक्षक असलेले किशोर मद्देर्लावार जागीच ठार झाले. अहेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात या अपघाताचा तपास सुरू आहे.
दोन्ही मुले विदेशात, तीन दिवसांनंतर अंत्यसंस्कार
मृतक यांची दोन्ही मुले उच्च शिक्षणासाठी विदेशात आहेत. त्यामुळे ते येण्यासाठी तीन दिवस लागतील. मुले आल्यावरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी सांगितले. रमेश गौरकर यांना पुढील उपचारासाठी अहेरी सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले. विशेष म्हणजे अपघात झाला, तेव्हा दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते.