आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळा नक्षलवाद्यांचा अड्डा
By admin | Published: August 5, 2015 01:34 AM2015-08-05T01:34:13+5:302015-08-05T01:34:13+5:30
जिल्ह्याच्या दुर्गम व संवेदनशील भागात जिल्हा परिषदेच्या शाळा व आरोग्य केंद्र नक्षलवादी आपल्या कामासाठी वापरत असल्याचे पोलीस यंत्रणेला आढळून आले आहे.
पोलीस विभागाची राहणार नजर : शाळेत नक्षल साहित्य सापडल्याने खळबळ
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम व संवेदनशील भागात जिल्हा परिषदेच्या शाळा व आरोग्य केंद्र नक्षलवादी आपल्या कामासाठी वापरत असल्याचे पोलीस यंत्रणेला आढळून आले आहे. सरकारी अधिपत्याखालील या संस्थांचा वापर माओवादी करीत असल्यामुळे पोलीस यंत्रणा आता यादृष्टीने आपली करडी नजर ठेवणार आहे.
नक्षलवाद्यांच्या संघटनांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान अहेरी तालुक्याच्या रेपनपल्ली पोलीस मदत केंद्रांतर्गत लिंगमपल्ली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीत नक्षल साहित्य मिळून आले. त्यामुळे शाळांचा वापर नक्षलवादी आपल्या कामासाठी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस प्रशासनाने यादृष्टीने आता आरोग्य केंद्र व शासनाच्या इतर विभागाच्या कार्यालयांवरही आपले लक्ष आता केंद्रीत केले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य केंद्रातून मोठ्या प्रमाणावर औषधीचा साठा माओवाद्यांकडे जातो. ही बाब यापूर्वीही गडचिरोली पोलीस दलाला आढळून आली होती. चकमकीनंतर जप्त करण्यात आलेल्या साहित्यात औषधी मोठ्या प्रमाणावर होती. ही औषधी शासनाकडून पुरवठा होणाऱ्या औषधीच्या प्रकारात मोडणारी होती. हा प्रकार दोन-तीन वर्षांपूर्वी दिसून आला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषद शाळेची इमारतच माओवादी वापरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. पोलीस शाळा वापरतात म्हणून एकीकडे माओवादी जिल्ह्यात शाळा इमारतींना टार्गेट करून नुकसान पोहोचवित होते. बडाझेलिया या धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत नक्षलवाद्यांनी बॉम्ब स्फोट घडविला होता. आता मात्र शाळा इमारती माओवादी वापरत आहे. हे लिंगमपल्लीच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे व शाळेचा वापर त्यांच्यासाठी होतो, हे प्रथमदर्शनीच आढळून आल्याचे पोलीस प्रशासनानेही कबूल केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)