आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:02 PM2017-10-30T23:02:45+5:302017-10-30T23:03:04+5:30
नक्षलग्रस्त आदिवासी बहूल धानोरा तालुका मुख्यालयापासून २४ किमी अंतरावर असलेल्या मुरूमगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : नक्षलग्रस्त आदिवासी बहूल धानोरा तालुका मुख्यालयापासून २४ किमी अंतरावर असलेल्या मुरूमगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्राच्या इमारतीची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. परिणामी येथे येणाºया रूग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींसह आरोग्य यंत्रणेचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया गृह आहे. मात्र या आॅपरेशन थिएटरमध्ये पावसाळ्यात पाणी गळती लागत असते. परिणामी अशा ठिकाणी शस्त्रक्रिया करणे पूर्णत: अयोग्य ठरते. तसेच प्रसुती कक्षाच्या छताची अवस्था वाईट असून हे छत कोसळण्याच्या मार्गावर आहे. छत कोसळून केव्हाही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या आरोग्य केंद्र परिसरात पाण्याच्या सुविधेसाठी विहीर खोदण्यात आली आहे. मात्र या विहिरीच्या प्लेटफार्मची अवस्था बकाल झाली आहे. या विहिरीच्या सभोवताल गवत उगवले असून विहिरीच्या ओट्याचे काँक्रीट पूर्णत: फुटलेले आहे. सदर विहिरीतील पाणी दूषित झाले असल्याने या परिसरातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ग्राम पंचायतीच्या सार्वजनिक नळाचा अथवा इतर सार्वजनिक विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. यात रूग्णांच्या नातेवाईकांची भटकंती सुरू असते. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने काही शासकीय निवासस्थानाला नळ कनेक्शन दिले आहे. परंतु बºयाच निवासस्थानांना नळ कनेक्शन देण्यात ग्रामपंचायत प्रशासनाने नकार दिल्याने येथील आरोग्य कर्मचाºयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महिला कर्मचारी निवासस्थानाचे दरवाजे तुटून पडले आहेत. सातत्याने मागणी करूनही गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य विभागाने सदर निवासस्थान दुरूस्तीसाठी प्रयत्न केले नाही. इमारत गळत असल्याने ताडपत्री टाकून काम चालविले जात आहे.
रिक्त पदाने सेवेवर परिणाम
मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची तीन, आरोग्य सेवकाची दोन, सफाई कामाराची एक व इतर अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना वेळेवर योग्य औषधोपचार येथे मिळत नाही. केंद्राची आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे.
इमारत दुरूस्तीचा प्रस्ताव पडून
मुरूमाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाच्या वतीने सदर इमारतीच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव तालुका आरोग्य अधिकाºयांमार्फत जि.प.च्या आरोग्य विभागाला पाठविण्यात आला. मात्र सहा महिने उलटूनही दुरूस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली नाही