आरोग्य केंद्राच्या जागेचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:30 PM2018-01-14T22:30:45+5:302018-01-14T22:30:57+5:30
रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रस्तावित असलेल्या जागेवर दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे बांधकामाला अडथळा निर्माण झाला होता. जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून जागा देण्यास राजी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रस्तावित असलेल्या जागेवर दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे बांधकामाला अडथळा निर्माण झाला होता. जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून जागा देण्यास राजी केले. त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
रंगय्यापल्ली हे मोठे गाव आहे. या गावाच्या सभोवताल अनेक लहान-मोठी गावे आहेत. या गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने तत्कालीन आ. दीपक आत्राम यांनी नवीन आरोग्य केंद्रासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी खेचून आणला. आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करायला लावले. आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी वन विभागाने २ हेक्टर जागा दिली आहे. शेतकºयांनी या जागेवर अधिकार सोडल्यानंतर आता सदर जागा आरोग्य केंद्राच्या मालकीची झाली आहे. कंकडालवार व जयसुधा जनगाम यांच्या मध्यस्थीनंतर शेतकºयांनी स्वत:हून अतिक्रमण काढले.
आरोग्य केंद्राच्या जागेची पाहणी करतेवेळी गडचिरोलीचे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ. मनोहर कन्नाके, डॉ. गणेश लाडस्कर, सरपंच सत्यमा कोरेत, आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, माजी उपसरपंच रवी सल्लम, प्रसाद मद्दीवार, कृउबासचे संचालक आकुला मल्लीकार्जुनराव, पेंटिपाकाचे उपसरपंच कुमरी सडवली, तिरूपती कम्मम, आतकुरी समय्या, बानय्या दुर्गम यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी शासनाने ६ कोटींचा निधी मंजूर केला आहे.