१५६ नागरिकांची आराेग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:36 AM2021-02-10T04:36:56+5:302021-02-10T04:36:56+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क अहेरी : पाेलीस प्रशासन व डाॅ. साळवे नर्सिंग काॅलेज, चातगाव यांच्या वतीने अहेरी तालुका मुख्यालयापासून २५ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : पाेलीस प्रशासन व डाॅ. साळवे नर्सिंग काॅलेज, चातगाव यांच्या वतीने अहेरी तालुका मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागातील टिकेपल्ली येथे राेगनिदान व आराेग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १५६ रुग्णांची माेफत तपासणी करण्यात आली. त्यांना औषधाेपचार पुरवून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डाॅ. साळवे नर्सिंग काॅलेज, चातगावचे संस्थापक-अध्यक्ष डाॅ. प्रमोद साळवे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच सुधाकर नैताम, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. किरण वानखेडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. गणेश लाडस्कर, डाॅ. हर्षदा लांजेवार, मुख्याध्यापक मुक्तेश्वर वनकर, आदी उपस्थित हाेते. राष्ट्रीय सुरक्षा, शांतता व सुव्यवस्था यांबरोबरच पोलीस विभाग वर्षभर सामाजिक उपक्रम राबवीत असतो. सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम पोलीस विभाग करीत असतो. त्याचाच भाग म्हणजे टिकेपल्ली येथे आयोजित केलेले आरोग्य शिबिर हाेय. या शिबिराचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी केले.
याप्रसंगी प्रकाश दुर्गे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रथम क्रमांक धर्मराव हायस्कूल लगाम, तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा टिकेपल्ली यांनी पटकावला. विजेत्यांना रोख पारिताेषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. एपीआय बाळासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व आभार मानले. यशस्वितेसाठी पोलीस पाटील गुरुदेव कोरेत, सरपंच सुधाकर नैताम, टिकेपल्ली येथील ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी, आदींनी सहकार्य केले.