धानाच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:11 PM2018-07-16T23:11:14+5:302018-07-16T23:11:39+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सिरोंचा व अहेरी तालुक्यात दरवर्षी सहकारी संस्थांमार्फत धानाची खरेदी केली जाते. मात्र धानाची उचल वेळेवर होत नसून साठवणुकीची पुरेशी व्यवस्थाही नाही. त्यामुळे ताडपत्री झाकून हे धान ठेवले जाते. पावसामुळे सदर धान सडण्याच्या स्थितीत आल्याने या धानाची दुर्गंधी सुटली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सिरोंचा व अहेरी तालुक्यात दरवर्षी सहकारी संस्थांमार्फत धानाची खरेदी केली जाते. मात्र धानाची उचल वेळेवर होत नसून साठवणुकीची पुरेशी व्यवस्थाही नाही. त्यामुळे ताडपत्री झाकून हे धान ठेवले जाते. पावसामुळे सदर धान सडण्याच्या स्थितीत आल्याने या धानाची दुर्गंधी सुटली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ही गंभीर समस्या सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा येथे निर्माण झाली आहे. सहकारी संस्थांच्या वतीने येथे धान खरेदी करण्यात आली. मात्र खरेदी केलेले धान केंद्राच्या परिसरात ताडपत्री झाकून ठेवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने हे धान भिजले. धान सडण्याच्या मार्गावर असल्याने त्याची दुर्गंधी सुटली आहे. सदर परिसरात बाजूला श्रीनिवास हायस्कूल व मुलांचे वसतिगृह आहे. त्यामुळे सदर परिसरात विद्यार्थी वावरत असता. या सडलेल्या धानाच्या दुर्गंधीचा त्रास विद्यार्थी व परिसरातील नागरिकांना होत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाक दाबून जावे लागत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सदर समस्येकडे आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या धानाची लवकरात लवकर उचल करावी, अशी मागणी अंकिसा येथील विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.
ताडपत्री झाकून धान्य ठेवण्याचा हा प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहावयास मिळतो. कोरची, धानोरा तालुक्यात दोन वर्षांपूर्वी पावसाने धान भिजून आदिवासी विकास महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते.