संपाने आरोग्य व्यवस्था कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:26 PM2018-04-16T23:26:40+5:302018-04-16T23:26:40+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.
५० खाटांची क्षमता असलेल्या कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. अनेक पदे रिक्त आहेत. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचा भार पूर्णपणे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावरच होता. आंतररुग्ण विभागातही मोजके नियमित कर्मचारी वगळता अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच अधिक भार आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना यापुढे त्यांच्या कामाच्या मूल्यांकनावरूनच मानधनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांची वागणूक व काम योग्य न आढळल्यास त्याला पगारवाढ दिली जाणार नाही, असे परिपत्रक आरोग्य विभागाने काढले आहे. त्यामुळे एनआरएचएम कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. एनआरएचएम कर्मचाºयांच्या कामबंद आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्था ठप्प पडली आहे.
संपामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यावर पोहोचली. त्यामुळे रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत माहिती होताच माजी जिल्हा परिषद सभापती निरांजनी चंदेल यांनी रुग्णालयाला भेट दिली. आंदोलकांशी चर्चा केली. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. शासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.
या आहेत आंदोलकांच्या मागण्या
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास १८ हजार पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी मागील १० वर्षांपासून अल्पशा मानधनावर कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. २ एप्रिल २०१८ रोजी एनयूएचएमचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी एनआरएचएम कर्मचाºयांना यापुढे फक्त सहा महिन्यांचीच पुनर्नियुक्ती देण्याबाबत पत्र काढले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करून मानधनवाढ दिली जाणार आहे. याबाबीला एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा विरोध असून ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.