संपामुळे आरोग्य यंत्रणा 'सलाईन'वर; रुग्णालयांमधील स्थिती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 02:19 PM2023-11-07T14:19:07+5:302023-11-07T14:21:52+5:30
माता व बालमृत्यूचा धाेका : जिल्हा रुग्णालयासह महिला, बाल रुग्णालयात तोकडे मनुष्यबळ
गडचिराेली : प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रसूती करण्याची महत्त्वाची जबाबदारी एनएचएम अंतर्गत कार्यरत अधिपरिचारिका सांभाळत असते. मात्र सेवेत कायम करावे, या मुख्य मागणीसाठी अधिपारिचारिकांनी काम बंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे प्राथमिक आराेग्य केंद्रात गराेदर मातांची प्रसूतीची समस्या गंभीर झाली आहे. गराेदर मातांना ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालयात रेफर केले जात आहे. याही ठिकाणी मनुष्यबळ नसल्याने माेठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशातील माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, रुग्णांना दर्जेदार सेवा देणे यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आराेग्य अभियानची (एनआरएचएम) स्थापना केंद्र शासनाने १२ एप्रिल २००५ राेजी केली. पुढे या अभियानाचा विस्तार करण्यात आला. आराेग्य विभागाचे अनेक विभाग व अनेक आराेग्याच्या नवीन याेजना या अभियानाशी जाेडण्यात आल्या. त्यामुळे या अभियानाचे नाव राष्ट्रीय आराेग्य अभियान (एनएचएम)असे ठेवण्यात आले. देशभरात लाखाे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले. एकट्या गडचिराेली जिल्ह्यात १ हजार ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना आराेग्य सेवेचे विविध प्रशिक्षण दिले गेले. त्यामुळे हे कर्मचारी प्रशिक्षित झाले आहेत. नियमित कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सदर कर्मचारी काम करीत आहेत. मात्र वेतन नियमित कर्मचाऱ्याच्या तुलनेत पाव भागही नाही. मात्र आज ना उद्या सरकार सेवेत सामावून घेईल या आशेने हे कर्मचारी काम करीत आहेत.
अभियानाच्या सुरुवातीला सेवेत दाखल झालेले काही कर्मचारी तर आता सेवानिवृत्त हाेण्याच्या मार्गावर आहेत. मात्र शासन सेवेत कायम हाेण्यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे. २५ ऑक्टाेबरपासून सुरू झालेले आंदाेलन तेराव्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे आराेग्य यंत्रणा काेलमडली आहे. सेवेत कायम करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संप आणखी किती दिवस चालेल हे अनिश्चित आहे.
उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालयातही देताहेत सेवा
गावातील उपकेंद्रापासून तर जिल्हा रुग्णालयापर्यंत एनएचएम कर्मचाऱ्यांची फळी काम करीत आहे. उपकेंद्रात एनएचएमचे समुदाय आराेग्य अधिकारी, कंत्राटी आराेग्य सेविका, प्राथमिक आराेग्य केंद्रात एक अधिपरिचारिका व एक एलएचव्ही, ग्रामीण रुग्णालयात डाॅक्टर, अधिपरिचारिका, परिचारिका, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, फॅसिलिटी मॅनेजर ही पदे भरली आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात स्पेशालिस्ट डाॅक्टर, परिचर, ओटी परिचर, डायलिसिस टेक्निशियनसह ग्रामीण रुग्णालयात असलेली सर्वच पदे एनएचएम अंतर्गत भरली आहेत.
- नियमित कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एनएचएम कर्मचाऱ्यांमार्फत काम चालविले जात आहे. मात्र आता याही कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने रुग्णालयांची यंत्रणा काेलमडली आहे.
सेवेत कायम हाेण्यासाठी आता आरपारची लढाई लढली जाणार आहे. आंदाेलन सुरू ठेवल्यास गैरहजेरी लावून कारवाई करण्याचे पत्र सहसंचालक (अतांत्रिक) एनएचएम मुंबई यांनी काढले आहे. मात्र याला आता कर्मचारी घाबरणार नाही. सेवेत कायम करण्याचे लेखी पत्र जाेपर्यंत निघत नाही ताेपर्यत आंदाेलन सुरूच ठेवले जाणार आहे.
- जितेंद्र काेटगले, मुख्य समन्वयक, एनएचएम कृती समिती