आरोग्य व्यवस्थेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:37 AM2018-07-05T00:37:10+5:302018-07-05T00:38:52+5:30
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी येथील रूग्णालयाला मंगळवारी एकाच दिवशी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली व रूग्णांसह कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली/सिरोंचा : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी येथील रूग्णालयाला मंगळवारी एकाच दिवशी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली व रूग्णांसह कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयाला मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास डॉ. अनिल रूडे यांनी भेट देऊन रूग्णांशी संवाद साधला. त्यानंतर कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी वैैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवर श्रुंगारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गादेवार, जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरएमओ डॉ. भागराज धुर्वे, शंकर तोरे, बालाजी पवार, जीवन काळे उपस्थित होते.
सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाला डॉ. अनिल रूडे यांनी भेट दिली असता, युवक क्रांती संघटनेच्या वतीने त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडण्यात आल्या. यामध्ये मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक पद भरण्यात आलेले नाही, नेत्र चिकित्सक, क्ष-किरण तज्ज्ञांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गरीब रूग्णांना शेजारील तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागत आहे, यासह रूग्णालयातील अन्य समस्यांवर चर्चा करण्यात आली.
डॉ. रूडे यांनी १०८ रुग्णवाहिकेसाठी लवकरच डॉक्टर उपलब्ध करून देणार व क्ष-किरण तज्ज्ञ अहेरी येथून आठवड्यातून एक - दोन दिवसासाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. ग्रामीण रूग्णालयात औषधीसाठा उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. रूडे यांनी आश्वासन दिले. यावेळी वैैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाकडे, डॉ. वल्क यांच्यासह युवक क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.