उपचाराविनाच काळजाच्या तुकड्याला कडेवर घेऊन परतले माता-पिता..!

By दिलीप दहेलकर | Published: March 18, 2023 03:36 PM2023-03-18T15:36:50+5:302023-03-18T15:38:18+5:30

आरोग्यकर्मी संपावर, रुग्णसेवा वाऱ्यावर : कंत्राटी कर्मचाऱ्यांची कसरत; लसीकरण बंद

Health workers on strike for old pension, patient care in jeopardy: contract staff exercise; Vaccination off | उपचाराविनाच काळजाच्या तुकड्याला कडेवर घेऊन परतले माता-पिता..!

उपचाराविनाच काळजाच्या तुकड्याला कडेवर घेऊन परतले माता-पिता..!

googlenewsNext

गडचिराेली : तापाने फणफणलेल्या तीन वर्षांच्या चिमकल्याला कडेवर घेऊन एक माता धापा टाकत बाह्य रुग्ण विभागात आली. आधी दहा रुपये देऊन नावनोंदणी केली. त्यानंतर धावत बाह्य रुग्ण विभागात पोहोचली, पण डॉक्टरांचा पत्ता नव्हता. तिला कर्मचाऱ्यांनी आंतर रुग्ण विभागाचा रस्ता दाखवला; पण तेथेही डॉक्टर नव्हते. त्यामुळे ती पुन्हा बाह्य रुग्णालयात आली व चौकशी कक्षाकडे धावली. अर्धा तास थांबूनही ना डॉक्टर धावले, ना इतर कर्मचाऱ्यांनी दखल घेतली. त्यामुळे लेकराच्या डोक्यावर हात फिरवून बावरलेल्या मातेने जड पावलांनी परतीचा मार्ग धरला. काळजाच्या तुकड्यावर उपचार व्हावेत, यासाठी धडपडणाऱ्या या मातेप्रमाणेच इतर पालकांचीही अशीच तारांबळ सुरू होती.

वेळ शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेची. स्थळ जिल्हा महिला व बाल रुग्णालय. जुनी पेन्शन याेजना लागू करण्याच्या मागणीसाठी १४ मार्चपासून शासकीय, निमशासकीय, मध्यवर्ती संघटना तसेच शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात वर्ग ३ व ४ चे नियमित आराेग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. या संपाचा सर्वांत जबर फटका बसला तो आरोग्य सेवेला.

राज्यव्यापी संपामध्ये सध्या आराेग्य विभागाचे वर्ग १ व वर्ग २ चे डाॅक्टर तसेच प्रशासकीय अधिकारी सहभागी नाहीत. मात्र, अनेकांनी या संपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे. परिचारिका, आराेग्य सेवक, वाॅर्डबाॅय, परिचर, औषधनिर्माता, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ व तत्सम नियमित आराेग्य कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी संपाचा चाैथा दिवस होता.

‘लोकमत’ने १७ मार्चला शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला, तेव्हा विस्कळीत रुग्ण सेवेचे विदारक वास्तव तर दिसलेच, पण दुसऱ्या बाजूला कंत्राटी कर्मचारी रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग.. याप्रमाणे अथकपणे राबतानाही दिसले. दाेन्ही रुग्णालयांच्या प्रशासकीय विभागात केवळ कंत्राटी कर्मचारी दिसून आले. प्रशासकीय कार्यालयाचा कारभारसुद्धा अर्ध्यापेक्षा कमी कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याचे दिसून आले. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

नियमित आरोग्यकर्मी संपावर गेल्याने आरोग्य सेवेची संपूर्ण धुरा कंत्राटी कर्मचारी पेलत आहेत. चार दिवसांपासून ते आळीपाळीने सेवा देत आहेत. कठीण प्रसंगी ते सर्वजण रुग्णांची सेवा सुश्रूषा करताना पाहावयास मिळत आहेत.

रुग्ण ताटकळले, बाह्य कक्ष बंद

येथील इंदिरा गांधी चाैकाजवळील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची आराेग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रभावित झाली आहे. १७ मार्चला दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजता बाह्य कक्ष बंद असल्याचे दिसून आले. बाह्य विभागात लसीकरण व इतरसेवा ठप्प होती. ४.३० वाजेपर्यंत येथे बालराेगतज्ज्ञ डाॅक्टर न आल्याने नातेवाईक ताटकळले होते. अनेकांना आल्यापावली परतावे लागले.

दोन्ही रुग्णालयांत पार पडताहेत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये म्हणून कंत्राटी कर्मचारी तैनात होते; पण संख्या अल्प असल्याने रुग्ण सेवेत काहीशा अडचणी येत होत्या. तथापि, १७ मार्चला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल गडे यांनी स्वत: काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या.

Web Title: Health workers on strike for old pension, patient care in jeopardy: contract staff exercise; Vaccination off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.