आरोग्य कर्मचारी करणार व्यसनमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:40 PM2018-06-27T23:40:15+5:302018-06-27T23:42:17+5:30
शिक्षक, मुख्याध्यापक, गाव संघटना, पोलीस पाटील यांच्यापाठोपाठ आता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही मुक्तिपथतर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात झाली असून मुक्तिपथ व आरोग्य विभागातर्फे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाºया एएनएम, आशा व एमपीडब्ल्यू यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिक्षक, मुख्याध्यापक, गाव संघटना, पोलीस पाटील यांच्यापाठोपाठ आता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही मुक्तिपथतर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात झाली असून मुक्तिपथ व आरोग्य विभागातर्फे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाºया एएनएम, आशा व एमपीडब्ल्यू यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मुक्तिपथच्या तालुका चमूंकडून देण्यात येईल.
धानोरा तालुक्याच्या गोडलवाही प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाºया ३२ आशांना मुक्तिपथ धानोरा कार्यालयाच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन धानोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर होते.
प्रास्ताविकातून डॉ. रवींद्र चौधरी यांनी उपस्थित आशांना प्रशिक्षण देण्यामागचा उद्देश, प्रशिक्षणाची गरज, मुक्तिपथची ओळख, दारू व खर्रा याचे व्यक्तीवर आणि समाजावर काय परिणाम होतात, तसेच सर्व आशांनी स्वत: निर्व्यसनी राहून सेवा द्यावी, असे सांगितले.
एखाद्या व्यक्तीला तंबाखूची सवय लागते व त्याचे व्यसनात रूपांतर होते. ती व्यक्ती यामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करूनही निघू शकत नाही, याची जाणीव उपस्थित आशांना रिंगण खेळाच्या माध्यमातून करून देण्यात आली. तंबाखूचे कुटुंबावर काय दुष्परिणाम होतात हे समजावून सांगण्यासाठी आशांना लक्ष्मीची कथा सांगण्यात आली. तर, दारू व तंबाखूचे दुष्परिणाम व त्यापासून होणारे आजार याबाबतची माहितीही आशांना देण्यात आली.
या प्रशिक्षणात आशांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी आशांनी तयार केलेल्या कृती कार्यक्रमानुसार या आशा स्वयंसेविका तंबाखूमुक्तीसाठी आपल्या भागात काम करणार आहेत.
वडसा तालुक्यातील ३० एएनएम, १० एमपीडब्ल्यू व ३७ आशा सेविकांना दारू आणि तंबाखूचे दुष्परिणाम व गावातील दारू, तंबाखूमुक्तीसाठी ते आपल्या कामाच्या माध्यमातून काय प्रयत्न करू शकतात याबद्दलचे प्रशिक्षण देण्यात आले.
मुलचेरा तालुक्यातील लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया आशा, एएनएम व एमपीडब्ल्यू यांना मुक्तिपथ मुलचेरा कार्यालयाच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला १९ आशा सेविका व १५ एएनएम आणि एमपीडब्ल्यू उपस्थित होते.
भामरागड तालुक्यातही आरोग्य विभागातील ४५ एएनएम व एमपीडब्ल्यूचे प्रशिक्षण पंचायत समिती सभागृह येथे पार पडले. या प्रशिक्षणाला तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
चार महिन्यांचा कृती कार्यक्रम तयार
गाव पातळीवर दारू व तंबाखूमुक्तिबाबत जनजागृती करण्यासाठी परिचारिका, आशा स्वयंसेविका, मलेरिया वर्कर आदी आरोग्य कर्मचाºयांना काम दिले जाणार आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रशिक्षणही मुक्तिपथतर्फे दिले जात आहे. धानोरा येथे आयोजित प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व आशा स्वयंसेविकांकडून पुढील चार महिन्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला व त्यांना आरोग्य प्रशिक्षण मार्गदर्शिका व चार्ट देण्यात आले. यानुसार गाव पातळीवर व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जाणार आहे.