विसापुरात अस्वच्छतेचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, घंटागाडी केव्हा येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 14:57 IST2024-11-27T14:55:14+5:302024-11-27T14:57:43+5:30
नागरिकांचा सवाल : नगरसेवक नाही, तक्रार करायची कुणाकडे?

heaps of garbage in Visapur?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगरपरिषद प्रशासनाद्वारे शहरातील सर्वच वार्डात स्वच्छ शहर, समृद्ध शहर असा डंका पिटवत स्वच्छतेबाबत पाठ थोपटली जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील काही वार्डात अस्वच्छतेमुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. न. प. हद्दी अंतर्गत येत असलेल्या विसापूर येथे सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून वार्डा वार्डात पसरलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी रहिवासी यांच्याकडून होत आहे.
नगर पालिका हद्दीत विसापूर हा भाग येत असून या गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. विसापूर-कोटगल या मुख्य मार्गावरच कचरा पसरल्याने येथे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच मार्गावर नगर परिषदेची शाळा सुरू आहे. तसेच प्रशासनाने या गावात अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गावात रस्ते, नाले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे नगर परिषदेची कचरा उचलणारी वाहने गावात नियमित पोहोचत नसल्याने गावात कचरा पसरला आहे. विशेषतः विसापूर-कोटगल रस्त्यावर रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, न. प. च्या उदासीनतेमुळे समस्या 'जैसे थे'च आहे. नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.