उन्हाचा तडाखा, आठ जणांना उष्माघाताचा फटका; गडचिराेलीचा आराेग्य विभाग सज्ज
By गेापाल लाजुरकर | Published: April 21, 2023 06:34 PM2023-04-21T18:34:25+5:302023-04-21T18:34:36+5:30
गडचिराेली : राज्यात चंद्रपूरचे तापमान वाढत असतानाच त्याला लागून असलेल्या गडचिराेली जिल्ह्यातीलही तापमान वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात उष्माघाताचे ८ ...
गडचिराेली : राज्यात चंद्रपूरचे तापमान वाढत असतानाच त्याला लागून असलेल्या गडचिराेली जिल्ह्यातीलही तापमान वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात उष्माघाताचे ८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आराेग्य विभाग सतर्क झाला असून दुपारच्या सुमारास नागरिकांनी तीव्र उन्हात बाहेर जाऊ नये किंवा कामे करू नयेत, असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात काेरची तालुक्यात ५, धानाेरा तालुक्यात १ तर गडचिराेली तालुक्यात २ उष्माघाताचे रुग्ण आढळले. गडचिराेली जिल्ह्यात गुरूवारी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात आली. शुक्रवारी मात्र जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते. त्यामुळे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात आली. सध्या ढगाळ वातावरण असले तरी येत्या आठवडाभरात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आराेग्य विभागाने जिल्हाभरात ६३ विशेष कक्ष स्थापन केले असून २५ बेडची व्यवस्था केली आहे.
येथे केली व्यवस्था
उष्माघात झालेल्या रुग्णांवर याेग्य उपचार व्हावा यासाठी गडचिराेली जिल्ह्यात ४९ प्राथमिक आराेग्य केंद्र, ३ उपजिल्हा रुग्णालय, ९ ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आदी ठिकाणी विशेष कक्ष तयार केले आहेत. साेबतच प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रात दाेन विशेष बेड, उपजिल्हा रुग्णालयात ५, ग्रामीण रुग्णालयात ३, जिल्हा सामान्य रुग्णालयात १० तर महिला व बाल रुग्णालयात ५ अशा एकूण २५ बेडची व्यवस्था केली आहे.