पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:43 AM2018-07-11T00:43:50+5:302018-07-11T00:44:14+5:30
जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.
एटापल्ली : तालुक्यातील वासामुंडी मार्गावरील मरकल नाल्यावरील पुलावर पाणी चढल्याने जीव धोक्यात घालून या मार्गाने जाणारे नागरिक, वाहन चालक पुलावरून प्रवास करीत होते. एटापल्लीपासून एक किमी अंतरावर डुम्मी नाला आहे. या नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे डुम्मी व जवेली या गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटू शकतो. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुलाजवळील डांबरी रस्त्याचा काही भाग खचला आहे. सततच्या पावसामुळे दरवर्षी हा भाग खचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या कशीबशी एसटी जाते. पुन्हा डांबरी भाग खचल्यास वाहन जाणे कठीण होणार आहे.
अहेरी : पावसामुळे अहेरी आगारातून सुटणाऱ्या एटापल्ली-जारावंडी, सिरोंचा-झिंगानूर, सिरोंचा-टेकडा या मार्गावरील बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.
चामोर्शी : तालुक्यातील कानोली येथील मोहन मारोती देवतळे यांच्या घराची भिंत पावसामुळे ८ जुलै रोजी कोसळली. यावेळी देवतळे कुटुंब घरातच झोपले होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. यामुळे १० हजार रूपयांचे नुकसान झाले. मात्र अजूनपर्यंत पंचनामा केला नसल्याची माहिती देवतळे यांनी दिली.
विजेअभावी भामरागडातील जनजीवन ठप्प
भामरागड तालुक्यात मागील चार दिवसांपासून सतत अतिवृष्टी सुरू आहे. शनिवारी भामरागड येथील वीज पुरवठा खंडीत झाला तेव्हापासून मंगळवारी रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. तीन दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडीत असल्याने सर्वच कार्यालयांमधील बॅटऱ्या पूर्णपणे डिस्चार्ज झाल्या. विजेअभावी बँक आॅफ महाराष्ट्रमधील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले होते. शासकीय कार्यालयातीलही संगणक बंद पडल्याने शासकीय कर्मचारी केवळ कार्यालय उघडून रिकामे बसले होते. विजेअभावी पेट्रोलपंप बंद आहे. शेतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे काही वाहनधारक ६५ किमी अंतरावर असलेल्या आलापल्ली येथून पेट्रोल-डिेझेल आणत आहेत. बीएसएनएल सेवाही ठप्प पडली होती.
भामरागडपासून चार किमी अंतरावर असलेल्या कुमरगुडा तसेच १२ किमी अंतरावर असलेल्या ताडगाव नाल्यावरील पुलावर मंगळवारी दुपारी पाणी चढले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. काही वाहनधारक मात्र पाणी असतानाही पुलावरून वाहन टाकत होते. पाऊस ओसरल्याने मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पुलावरील पाणी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती.