अहेरी व भामरागडात दमदार पाऊस; इतरत्र रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 08:05 PM2023-06-26T20:05:04+5:302023-06-26T20:05:29+5:30
Gadchiroli News अहेरी व भामरागड या दाेन तालुक्यांना पावसाने झाेडपून काढले. इतर तालुक्यांमध्ये मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती.
गडचिराेली : अहेरी व भामरागड या दाेन तालुक्यांना पावसाने झाेडपून काढले. इतर तालुक्यांमध्ये मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. विशेष म्हणजे, अजूनही काही तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. २१ जून राेजी गडचिराेली तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात मान्सून काेसळला. चार दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काेसळत असलेल्या पावसावरून जिल्ह्यातही दमदार पाऊस हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र अजूनही दमदार पाउस झाला नाही. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात भीती बाळगतच पेरणीची कामे आटाेपत आहेत. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण हाेते. तर साेमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू हाेती. मात्र, माेठा पाऊस आला नाही. दुसरीकडे अहेरी व भामरागड तालुक्याला पावसाने चांगलेच झाेपडून काढले. अहेरी तालुक्यात ४८.८ मिमी, तर भामरागड तालुक्यात ३३.१ मिमी पाऊस पडला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण २० मिमी पेक्षा कमीच आहे.
कुरखेडा व देसाईगंजला पावसाची हुलकावणी
जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. मात्र देसाईगंज व कुरखेडा या तालुक्यांना पावसाने हुलकावणी दिली आहे. देसाईगंज तालुक्यात २६ जूनपर्यंत केवळ ४.३ मिमी पाऊस पडला आहे. तर कुरखेडा तालुक्यात एकही पाऊस पडला नाही. त्यामुळे या दाेन्ही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. अशाच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.
२८ जूननंतर विश्रांती ?
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार २७ जून राेजी मंगळवारी जिल्ह्याच्या अगदी तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस हाेईल. २८ जूननंतर मात्र पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तविली आहे. हाच अंदाज नागपूर, वर्धा, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांसाठीही वर्तविला आहे.