गडचिरोलीत तुफान पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 07:19 PM2018-07-16T19:19:18+5:302018-07-16T19:29:52+5:30
प्राणहिता नदीत एक तरुण बेपत्ता
गडचिरोली : मुसळधार पावसानं गडचिरोली शहर आणि जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. सोमवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार २४ तासात ७०.६ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक नद्या व नाल्यांना पूर आला आहे. पुराचं पाणी पुलांवर वाहू लागल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे एसटी महामंडळाला ७० बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे एक तरुण बेपत्ता झाला आहे. अहेरी तालुक्यातील प्राणहिता नदीत डोंगा उलटून व्यंकटेश शंकर सिडाम (२५) वाहून गेला. त्याचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता. गडचिरोली शहरासह धानोरा, चामोर्शी, मुरचेरा, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात सर्वाधिक १८४.४ मिमी पाऊस गडचिरोली तालुक्यात झाला. अनेक वर्षानंतर गडचिरोली शहवासियांनी अवघ्या ८ ते १० तासात एवढा पाऊस अनुभवला. शहराच्या सखल भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने काही वस्त्या जलमय झाल्या आहेत.