रात्रभर धो- धो, गडचिरोलीचा नागपूर, चंद्रपूरशी संपर्क तुटला
By संजय तिपाले | Published: July 21, 2024 05:09 PM2024-07-21T17:09:24+5:302024-07-21T17:09:36+5:30
चार महामार्गांसह ३४ रस्ते बंद: भामरागडमध्ये २५ दुकानांत शिरले पाणी
गडचिरोली: जिल्ह्यात २० जुलैला रात्रभर धो- धो पाऊस बरसला. परिणामी सर्व रस्ते जलमय झाले. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क तुटला असून चार राष्ट्रीय महामार्गांसह ३४ रस्त्यांची रहदारी सध्या बंद आहे. भामरागडला पुराचा सर्वाधिक फटका बसला. तेथे २५ दुकानांत पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. दुसरीकडे अर्धे गडचिरोली शहरही पाण्याखाली गेले.
जिल्ह्यात २० जुलै रोजी रात्री ८ ते पहाटे ३ वाजेपर्यंत १९८ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात ४० पैकी १५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. गडचिरोली मंडळात सर्वाधिक १९८.४ इतका पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. याचा फटका आठवडी बाजारालाही बसला. आलापल्ली- भामरागड, आलापल्ली - सिरोंचा, गडचिरोली- आरमोरी व गडचिरोली - चामोर्शी हे चार राष्ट्रीय महामार्ग रहदारीसाठी बंद आहेत. यासोबतच इतर ३० रस्त्यांवरही पुरामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला .
उत्तरेकडून हळूहळू पाणी ओसरणे सुरू असून क्रमाक्रमाने बंद असलेले मार्ग सुरू होतील, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
वैनगंगा, इंद्रावतीने ओलांडली धोक्याची पातळी
दरम्यान, आष्टी (ता. चामोर्शी) येथे वैनगंगा नदीतून ५.९४ क्युसेक्स पाण्याचातर पातागुडम (ता. सिरोंचा) येथे इंद्रावती नदीपात्रातून ४.६७ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
गोसेखुर्दच्या पाणीपातळीत वाढ
गोसेखुर्द धरणातून २० जुलैपासून २.१४ लक्ष क्युसेक्स विसर्ग सुरु होता. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या पाणलोट भागात मागील २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ३.५ लक्ष क्युसेक्स एवढी पाणी पातळीत वाढ झालेली आहे.
चिचडोह, मेडिगड्डा धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता
वैनगंगा नदीवरील चिचडोह प्रकल्पातून ५.५४ क्युसेक्स पाण्याचा तर गोदावरी नदीपात्रावरील मेडिगड्डाच्या लक्ष्मी प्रक्लपातून ४.६७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
कोटगल बॅरेजवरील ७० कामागार सुरक्षितस्थळी
दरम्यान, गडचिरोली शहराजवळील कोटगल बॅरेजवरील ७० कामगारांना २१ जुलै रोजी सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाने (एसडीआरएफ) या कामगारांना सुरक्षितस्थळी पोहोचविले.