मुसळधार पावसाने जिल्हा जलमय

By admin | Published: July 10, 2016 12:59 AM2016-07-10T00:59:45+5:302016-07-10T00:59:45+5:30

गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात

Heavy rains brought water to the district | मुसळधार पावसाने जिल्हा जलमय

मुसळधार पावसाने जिल्हा जलमय

Next

कन्नमवार जलाशय ओव्हरफ्लो : नद्या फुगल्या, अनेक मार्ग बंद; जनजीवन प्रभावित
गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार १४९.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने घेतली आहे. सर्वच नद्या फुगल्या असून पुलावरून पाणी वाहत आहे. पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली असून २०० वर गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे. चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशय १०० टक्के भरला असून पाणी ओव्हरफ्लो होत आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ६७.५४ क्युबीक मीटर एवढी आहे.
भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्यामुळे शनिवारी पहाटेपासूनच भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अहेरी नजीकच्या गडअहेरी नाल्यावर पाच ते सात फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. शिवाय अहेरी तालुक्यातील ३० वर गावांचा संपर्क अहेरी तालुका मुख्यालयाशी तुटला आहे. दिना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आलापल्ली-आष्टी मार्गावरील वाहतूक बंद आहे. दरम्यान या भागातील लोकांचा गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली तालुक्यातील मौशी-वडधा मार्गावरील नाल्यावर एक फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील जड वाहतूक बंद आहे. वैलोचना नदीच्या पुलावर पाणी चढल्याने शनिवारी सकाळी ६ वाजतापासून वैरागड-देलनवाडी या मार्गावरील वाहतूक बंद आहे. धानोरा तालुक्यातील मुस्का-तळेगाव दरम्यानच्या नाल्यावर पाणी चढल्याने हा मार्ग सुध्दा बंद आहे. तसेच इरूपधोडरी-सुरसुंडी दरम्यानच्या नाल्यावर पाणी असल्याने सदर मार्ग बंद आहे. मुलचेरा तालुक्यातही जोरदार पाऊस झाल्याने नजीकच्या गोमणी नाल्याला पूर येण्याची शक्यता आहे.
गोसेखुर्द धरणाचे २६ गेट ०.५० मीटरने व सात गेट एक मीटरने उघडण्यात आले असून यातून ३ हजार ७९३ क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग आहे. तसेच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, दिना, पर्लकोटा, बांडे, वैलोचना, कठाणी आदीसह बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहे. मोसम नदी गाव नाल्यावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने सिरोंचाकडे जाणारी वाहतूक ठप्प पडली आहे. अहेरी-मुलचेरा मार्गावरील अहेरी-बोटलाचेरू गावाजवळ झाड पडल्याने मार्ग बंद होता. अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी यांनी सदर झाड हटविण्याच्या सूचना केल्या. एटापल्ली-गट्टा मार्गावरील आलदंडी नदी पुलावरून सात ते आठ फूट पाणी वाहत असल्याने सुरजागड पट्ट्यातील ७० गावांचा संपर्क तुटला आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील देवदा ते हालेवारा दरम्यान असलेल्या झुरी नाल्यांमुळे सदर मार्ग बंद आहे. एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील रेगडी धरणाच्या दाबामुळे बोलेपल्ली ते हेटलकसा दरम्यान नाल्यावरून पाणी जात असल्याने सदर मार्ग बंद आहे. एटापल्लीलगतच्या डुम्मी नाल्याला पूर असल्याने एटापल्लीपासून चार ते पाच किमी अंतरावरील डुम्मी, जव्हेली, मरपल्लीसह इतर गावांचा संपर्क तुटला आहे. मुलचेरा-बोलेपल्ली, कोपरअल्ली-आष्टी, लगाम-मुलचेरा मार्ग बंद आहे. एटापल्ली येथे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. देचलीपेठा मार्गावरील नाले भरून वाहत असल्याने २० गावांचा संपर्क तुटला आहे. रेखेगाव-भाडभिडी-घोट मार्गावर रेखेगावनजीक रामजी नरोटे यांच्या शेताजवळ झाड कोसळले. त्यामुळे सदर मार्ग बंद होता. अनंतपूर-रेखेगाव मार्गावर पाणी आहे. दिना धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने आष्टी-अहेरी मार्गावरील दिना नदी पुलावर शनिवारी रात्रीपर्यंत पाणी चढण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

२० हून अधिक घरांची पडझड
४धानोरा तालुक्यातील इरूपधोडरी, सुरसुंडी, मोहल्ली व धानोरा येथे पावसामुळे चार घरांची अशंत: पडझड झाली. तसेच जिल्ह्याच्या दुर्गम भागांमध्येही अनेक घरांची पडझड झाल्याने नागरिकांचे नुकसान झाले.

चामोर्शी, आरमोरी जलमय
४गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने चामोर्शी शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. नाल्या तुडूंब भरून वाहत आहे. नालीतील सांडपाणी व पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले आहे. चामोर्शी शहरातील शिवाजी हायस्कूल यशोधरा विद्यालय जा. कृ. बोमनवार शाळेच्या पटांगणात पाणी साचले. गडचिरोली-चामोर्शी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. चामोर्शी मुख्य मार्गावरील पोर नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील शेती पाण्याखाली आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रोडवर व पुलावरून पाणी वाहत आहे. आरमोरी तालुक्यातही संततधार पाऊस बरसला. तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे.

अहेरी तहसीलदारांनी केली पाहणी
४अहेरीचे तहसीलदार एस. एम. सिलमवार, नायब तहसीलदार एन. एल. गुरनुले, सी. एल. किरमे, आपत्ती व्यवस्थापन समितीचे लिपीक व्ही. बी. दुधबळे, तलाठी जे. जी. अनलदेवार यांनी गडअहेरी नाला व दिना नदीवरील पूर परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. तहसीलदार सिलमवार यांनी आवश्यक त्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या.

वैलोचना नदीच्या पुलावरून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास
गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने वैरागडजवळून वाहणाऱ्या वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी पुलावर रात्रीपासून पाणी चढला आहे. त्यामुळे वैरागड-मानापूर मार्ग बंद झाला असून वैरागडपलीकडील १० गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवारी सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. या मार्गावरील बसफेऱ्या परतल्या. पूर परिस्थितीमुळे नदी पलिकडील मेंढेबोळी, सुकाळा, मोहझरी, शिवणी बुज, मानापूर, देलनवाडी व नागरवाही या गावांचा संपर्क तुटला. पुरामुळे नदी पलिकडील शेतातील रोवणीचे काम पूर्णपणे ठप्प पडले.

चौडमपल्ली पुलावर दिवसभर पाणी
४आष्टी-अहेरी मार्गावरील चौडमपल्ली नाल्यावरील पुलावर शनिवारी सकाळी ९ वाजता पाणी चढले. दिवसभर तीन फूट पाणी पुलावरून वाहत असल्याने आष्टी-अहेरी मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प पडली होती. सायंकाळी मार्ग सुरू झाला.

Web Title: Heavy rains brought water to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.