वादळी पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:00 AM2020-10-22T05:00:00+5:302020-10-22T05:00:39+5:30
अंकिसा परिसरात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. याशिवाय या भागातील शेतकरी मिरची, कापूस पिकाचीही लागवड करतात. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन या भागात घेतले जाते. हलके, मध्यम व जडप्रतीच्या धानाची लागवड केली जाते. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी हलके व मध्यम प्रतीच्या कमी मुदतीच्या धानपिकाची शेतात लागवड केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिराेंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरात मंगळवारी रात्रभर वादळी पाऊस बरसला. या वादळी पावसाचा धान, मिरची, कापूस पिकांना माेठा फटका बसला. या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अंकिसा परिसरात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. याशिवाय या भागातील शेतकरी मिरची, कापूस पिकाचीही लागवड करतात. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन या भागात घेतले जाते. हलके, मध्यम व जडप्रतीच्या धानाची लागवड केली जाते. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी हलके व मध्यम प्रतीच्या कमी मुदतीच्या धानपिकाची शेतात लागवड केली. तुडतुडा, मावा व इतर राेगाचे व्यवस्थापन करून व कीटकनाशक फवारणीवर हजाराे रुपयांचा खर्च केल्यानंतर शेतकऱ्यांचे धानपीक वाचले. हलके धानपीक पूर्णत: निसवल्याने येत्या काही दिवसात या धानाची कापणी करण्यात येणार हाेती. हातात भरघाेस उत्पादन हाेईल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना हाेती. दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास बराचवेळ वादळी पाऊस बरसला. पावसापेक्षा वादळाचा वेग अधिक हाेता.
परतीच्या वादळी पावसामुळे परिसराच्या बालमृत्यमपल्ली येथे धानपिकाचे माेठे नुकसान झाले. कापणीयाेग्य झालेला शेतातील उभे धानपीक आडवे पडले. कापूस व मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे. शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी महसूल विभागाने बालमृत्यमपल्ली व अंकिसा परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.