गडचिरोली जिल्ह्यातील नऊ तालुक्यात अतिवृष्टी; पर्लकोटा नदीला पूर, शंभरावर गावांचा संपर्क तुटला
By मनोज ताजने | Published: September 12, 2022 11:13 AM2022-09-12T11:13:12+5:302022-09-12T11:33:23+5:30
२४ तासात ८६.६ मिमी पावसाची नोंद; ८ मार्गावरील वाहतूक बंद
गडचिरोली : जिल्ह्यात सर्वदूर पावसाने पुन्हा एकदा जोरदार धडक दिली आहे. गेल्या २४ तासात ८६.६ मिमी पाऊस बरसल्याने नदी आणि नाल्यांची पातळी चांगलीच वाढली आहे. ठेंगणे पूल पाण्याखाली आल्याने ८ मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
रविवारी दिवसभर अधूनमधून रिमझिम पावसाची सर येत होती, पण रात्री पावसाने चांगलाच जोर पकडला. मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हाहाकार उडाला. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली -गुरवाळा, माडेमुल-रनमुल, चांदाळा-कुंभी, धानोरा-सोडे, पेंढरी-पाखांजुर, साखरा-कारवाफा, लाहेरी-बिनागुंडा (गुंडेनुर नाला), आलापल्ली -ताडगांव-भामरागड
(कुडखेडी नाला, पेरीमिली नाला, पर्लकोट नदी) आदी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात ९ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस असा आहे. गडचिरोली ११७.१ मिमी, कुरखेडा ८८.०, आरमोरी ७०.९, चामोर्शी ८४.४, सिरोंचा ६०.०, अहेरी १०५.६, एटापल्ली ६१.३, धानोरा ११५.९, कोरची ११३.७, देसाईगंज ६०.५, मुलचेरा ७८.४, आणि भामरागड तालुक्यात ८३.४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. छत्तीसडमध्ये रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे इंद्रावती, पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळे भामरागडलगतचा पूल पुन्हा एकदा पाण्याखाली जाऊन शंभरावर गावांचा संपर्क तुटला आहे.