यंदा भरपूर पाऊस, काेराेनानंतर आता जिल्ह्यात आता पुराची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:44+5:302021-06-10T04:24:44+5:30
गडचिराेली जिल्हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक पर्जन्यमान पडते. जिल्हाभरातून ४ माेठ्या नद्या ...
गडचिराेली जिल्हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक पर्जन्यमान पडते. जिल्हाभरातून ४ माेठ्या नद्या व १० लहान नद्या वाहतात. तसेच अनेक नदीवजा नाले आहेत. या नदी, नाल्यांच्या काठावर शेकडाे गावे वसली आहेत. वैनगंगा, गाेदावरी, इंद्रावती या नद्या दुसऱ्या राज्यातून वाहत येतात. त्यामुळे दुसऱ्या राज्यात जरी पाऊस झाला तरी या नद्यांना पूर येतो व या नद्यांना लागून असलेल्या इतरही नद्यांना दाब निर्माण हाेऊन पूर येतो. त्यामुळे पावसाळ्याचे चार महिने पूरग्रस्त गावांसाठी धाेकादायकच मानले जातात.
दुर्गम भागातील अनेक गावांना जाण्यासाठी रस्ते नाहीत. नाल्यांवर पूल नाहीत. त्यामुळे नाल्याच्या पाण्यातूनच प्रवास करावा लागते. यामुळेही जीवित हानी झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण हाेण्याची शक्ता असल्याने जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे.
बाॅक्स
४७ गावे पूरबाधित क्षेत्रात
-जिल्ह्यातील ४७ गावे नदीजवळ व सखल भागात आहेत. या गावांना पुराचा वेळाेवळी फटका बसत असल्याने या गावांना पुरबाधित गावे म्हणून घाेषित करण्यात आले आहे. या गावांमधील नाल्यांचा उपसा करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत चांगले राहण्यासाठी उपाययाेजना केल्या जात आहेत. नागरिकांसाठी आश्रयगृहाची साेय करण्यात आली आहे. साथराेग हाेऊ नये यासाठी आराेग्य विभागाला सतर्क करण्यात आले आहे. नवसंजीवनी याेजनेंतर्गत धान्य वाटप करून औषधी साठा ठेवण्यात आला आहे. गुरांसाठी पुरेसा चारा असल्याची शहानिशा करण्यात आली आहे.
- सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी तालुक्यावर तालुका तहसीलदार व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला जाईल.
बाॅक्स
अग्निशमन दल नावापुरतेच
जिल्ह्यात गडचिराेली, देसाईगंज, अहेरी, सिराेचा, चामाेर्शी या पाच ठिकाणी अग्निशमन दल आहेत. मात्र येथील अग्निशमन दल नावापुरतेच आहे. प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. एवढेच नाही तर चालकसुद्धा कंत्राटी तत्त्वावर ठेवण्यात आले आहेत.
काेट
मागील वर्षी १८ गावांतील ३५ लाेकांचा जीव वाचविला हाेता. २८६ लाेकांना पुरातून काढण्यात आले हाेते. यावर्षीही आश्रयगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली तरी जीवित हानी हाेणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे.
कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
.............................................................................................
जिल्ह्यातील नद्या -१४
नदीशेजारची गावे-२१२
पर्जन्यमान-१,२५४ मिमी
पूरबाधित तालुके-१०
फायर फायटर-५
फायबर बाेट-१५
जॅकेट-५५०
कटर-१७