झिंगानूर भागात भीषण पाणीटंचाई
By admin | Published: June 1, 2017 01:58 AM2017-06-01T01:58:02+5:302017-06-01T01:58:02+5:30
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर भागातील अनेक गावांमधील विहिरी कोरड्या पडल्या असून हातपंपाच्या पाण्याची पातळी खालावली आहे.
विहिरी कोरड्या : बैलबंडीद्वारे ड्रमातून आणावे लागत आहे दूरवरून पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर भागातील अनेक गावांमधील विहिरी कोरड्या पडल्या असून हातपंपाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी झिंगानूर चेक नं. १ व झिंगानूर चेक नं. २ या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अनेक नागरिकांना बैलबंडीद्वारे ड्रमातून लांब अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.
सिरोंचा तालुक्यात गेल्या १५-२० दिवसांपासून प्रचंड उष्णतामान होते. कडक उन्हामुळे या भागातील पाणी स्त्रोताची पाण्याची पातळी प्रचंड खालावली. मे महिन्या सुरुवातीलाच या भागातील तलाव, बोड्या, नाले व विहिरी पूर्णत: कोरड्या झाल्या. विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर भागात पाण्याची पातळी खालावल्यामुळे नव्याने खोदण्यात येत असलेल्या हातपंपांना तसेच विहिरींना कमी अंतरावर पाणीही लागत नाही. या भागात खडक असल्याने अनेक नवीन विहिरींचे बांधकामही रखडले आहे. झिंगानूर येथे नळ पाणीपुरवठा योजना नाही. तसेच पाण्याची टाकी नाही. त्यामुळे या भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. पाणीटंचाईमुळे पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. महिलांची सकाळपासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू होत असते.
प्रशासनाचे दुर्लक्ष
सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर भागात भीषण पाणीटंचाई असतानासुद्धा प्रशासनाचे एकही अधिकारी तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली नाही. झिंगानूर भागातील मूलभूत समस्यांकडे शासन, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.