राजारामात मोकाट जनावरांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:24 PM2019-07-14T22:24:58+5:302019-07-14T22:25:16+5:30
अहेरी तालुक्याच्या कमलापूर व राजाराम परिसरात आलापल्ली-सिरोंचा या मुख्य मार्गावर दिवसा व रात्री मोकाट जनावरांचा हैदोस राहतो. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनांची वर्दळ राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर व राजाराम परिसरात आलापल्ली-सिरोंचा या मुख्य मार्गावर दिवसा व रात्री मोकाट जनावरांचा हैदोस राहतो. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनांची वर्दळ राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
राजाराम-कमलापूर मार्गावर मोकाट जनावरामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. सदर मार्गावर नियमित मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बसून असतात. सदर मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. भरधाव वाहनाची धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसंगी जनावराला वाहनाची धडक बसल्यास या अपघाताला जनावर मालक वाहन चालकाला व मालकाला जबाबदार धरतात. परिणामी त्यांना आर्थिक दंड भरून द्यावा लागतो. सातत्याने मागणी करूनही रस्त्यावर व गावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. आता तरी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने ठोस नियोजन करून मुख्य मार्गावरील तसेच गावातील जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारक करीत आहे.
अहेरी तालुक्याच्या अनेक मोठ्या गावांमध्ये मोकाट जनावरांची समस्या सध्या ऐरणीवर आली आहे. वन विभागाच्या वतीने राखीव वन क्षेत्रात व इतर जंगल परिसरात कुंपन करून जनावरांना जंगलात शिरण्यास मज्जाव केला जात आहे. परिणामी जनावरांना चराईसाठी जागाच उरली नाही. त्यामुळे मोकाट जनावरे गावाच्या परिसरात तसेच मुख्य मार्गावर फिरत असतात. याला कारण बदलती परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळात पाळीव जनावरे चराईला नेण्यासाठी गुराखी मिळत होते. मात्र आता ग्रामीण भागातील गावांमध्ये गुराखी मिळत नाही. त्यामुळे जनावर मालकांकडेही जनावरे राखण्यासाठी वेळ नाही. परिणामी जनावर तशीच मोकाट सोडून दिली जातात. बंदोबस्त होणे आवश्यक आहे.
अहेरीच्या आठवडी बाजारातही समस्या
राजनगरी अहेरी शहरात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. अहेरी शहरासह लगतच्या गावातील अनेक महिला व पुरूष या बाजारात खरेदी व विक्रीसाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सदर आठवडी बाजारात मोकाट जनावरांचा हैदोस वाढला आहे. अनेकदा बाजारात जनावरांची झुंज लागते. त्यामुळे यापूर्वी कित्येकदा नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. १३ जुलै रोजी शनिवारला भरलेल्या येथील आठवडी बाजारात बैलाच्या झुंजीत एक वृध्द महिला खाली पडून जखमी झाली. सदर समस्येवर तोडगा न निघाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न.पं.ने बंदोबस्त करावा.