हॅलो बोलाऽऽ मी ड्रायव्हिंग करतोय!

By Admin | Published: February 8, 2016 03:17 AM2016-02-08T03:17:42+5:302016-02-08T03:17:42+5:30

वाहतूक नियमांना हरताळ फासण्याची स्पर्धाच उपराजधानीत सुरू आहे. लोकमत चमूने शहरातील काही महत्त्वाच्या चौकांत उभे राहून याचा कानोसा घेतला असता, ...

Hello I'm Driving! | हॅलो बोलाऽऽ मी ड्रायव्हिंग करतोय!

हॅलो बोलाऽऽ मी ड्रायव्हिंग करतोय!

googlenewsNext

नागपूर : वाहतूक नियमांना हरताळ फासण्याची स्पर्धाच उपराजधानीत सुरू आहे. लोकमत चमूने शहरातील काही महत्त्वाच्या चौकांत उभे राहून याचा कानोसा घेतला असता, एका हातात अ‍ॅक्सिलेटर, दुसऱ्या हातात मोबाईल...एका पायात ब्रेक तर दुसऱ्या पायात गिअर अशी ‘सर्कस’ करत भर रस्त्यावरून धावणारे वाहनचालक पदोपदी आढळून आले. जो ‘कॉल’ नंतरही घेता आला असता तो जीवापेक्षा जास्त महत्त्वाचा झाल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले आहे. हाच प्रश्न काही दुचाकीस्वारांना विचारला असता काहींनी याचे समर्थन केले तर काहींनी विरोध केला तर काहींनी विविध कारणे सांगितली.

वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. आर्थिक शिक्षेसह थेट परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे. या भीतीमुळे स्वत:च्या जीवाची पर्वा असल्याने कितीही महत्त्वाचा फोन आला तरी मोटारसायकल चालविताना तो घेत नाही. वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करूनच तो घेतो.
-शरद भांगे, बैधनाथ चौक

घरुन मोबाईल बिलचे पैसे फारच कमी मिळतात. यातच ज्याने फोन केला त्याचा फोन त्याचवेळी न घेता नंतर केल्यावर उगाच आपले पैसे जातात. काम त्याचेच राहते. म्हणून गाडीवर असो किंवा आणखी कुठे फोन उचलण्यासाठी थांबत नाही. मजबुरी आहे.

मी एकटी कधीच गाडी चालवित नाही. माझ्या सोबत एक तर आई, बहीण किंवा मैत्रिण असतेच. वाहन चालविताना माझा मोबाईल मागे बसणाऱ्यांकडे देऊन टाकतो. फोन आल्यावर ते माझ्या कानाला मोबाईल लावून धरतात. यामुळे अपघात होत तर नाहीच पोलीस दादाही पकडत नाही आणि आपले कामही होऊन जाते. महत्त्वाचे म्हणजे वेळ वाचतो.
- नेहा पाटील, कमाल चौक
मोटारसायकल चालविताना मोबाईलवर बोलू नये, हे मान्य आहे. मात्र काही वेळेस बोलण्याशिवाय पर्याय नसतो. आमच्या साहेबांनी जर फोन केला अन तो आम्ही उचलला नाही तर ते त्यांना बिलकूल आवडत नाही. त्यामुळे ड्रायव्हिंग करत असतानाही त्यांचा फोन घ्यावा लागतो. आणि सोहबांचे फोन नेमके गाडी चालवितानाच येतो. माझा नाईलाज आहे.
-उमेश चव्हाण, मेडिकल चौक

अनेकवेळा मोटारसायकल चालवित असताना कुणा एका मित्राला मदत पाहिजे असते, डॉक्टराचे नाव सांग, हॉस्पिटलचे नाव किंवा अमुक मित्र कुठे भरती आहे याची विचारणा होते. अशावेळी वाहन थांबवून फोन करणे शक्यच होत नाही. अशावेळी मी चालत्या मोटारसायकलवरच बोलतो. हे धोकादायक आहे, पण समोरच्या व्यक्तीचा प्रत्येक क्षणही महत्त्वाचा आहे.
-सुनील जवादे, कॉटन मार्केट चौक

रस्त्यावर वाहन उभे करून मोबाईलवर बोलल्यास अनेक जण आमच्याकडे वेडा झाल्यासारख्या नजरेने पाहतात. काही जण ‘टाँट’ही मारतात. एक-दोनदा असेच झाले. यामुळे मग गाडी चालविताना फोन आल्यास न थांबताच बोलते. अशावेळी अपघात होऊ नये म्हणून गाडी हळू चालविते.
- रुबी भगत, अंबाझरी चौक

एका हाताने मोटारसायकल चालवित दुसऱ्या हाताने मोबाईलवर बोलण्याची सवयच झाली आहे. तुम्ही कितीही गर्दीतून कानाला मोबाईल लावून वाहन चालविण्यास सांगा, मी ते करून दाखवितो. हं पण जर समोर पोलीस असेल तर पटकन फोन खिशात टाकतो. समोर गेल्यावर पुन्हा बोलतो. एक-दोन वेळा पोलिसांनी पकडले. आर्थिक भूर्दंड बसला. पण आता हे रोजचे झाले आहे.
- राजू शंभरकर, अजनी चौक

Web Title: Hello I'm Driving!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.