कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:50+5:30
निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठा करावा. कुरखेडावरून कोरची येथे येणारी विद्युत लाईन कुरखेडा-कोरची रस्त्याच्या कडेला लावावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे वर पाण्याची शेती संकटात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय व साधने उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु पावसाच्या पाण्यावर शेती करणारे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाग्रामसभेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.
निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठा करावा. कुरखेडावरून कोरची येथे येणारी विद्युत लाईन कुरखेडा-कोरची रस्त्याच्या कडेला लावावी. तोपर्यंत देवरीवरून विद्युत पुरवठा करावा, तालुक्यात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करावी, तसेच पाच- पाच पार्इंटचे दोन ट्रान्सफार्मर लावावे. दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने रोजगार हमीची तसेच कुशल, अकुशल कामे मंजूर करावी, तालुक्यातील मसेली, कोटगूल, कोटरा येथे राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा मंजूर कराव्या तसेच कोरची येथे एसबीआयची शाखा उघडावी. तालुक्यात केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. परंतु कव्हरेज वारंवार विस्कळीत होतो. त्यामुळे खासगी कंपन्यांचे टॉवर उभारावे. गावपाड्यांना महसूली गावाचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडूराम हलामी, सचिव नरेंद्र सलामे, सहसचिव कुमारी जमकातन, राजाराम नैैताम, कल्पना नैैताम, शीतल नैैताम, सियाराम हलामी, इजामसाय काटेंगे, नंदकिशोर वैरागडे, रूपेश कुमरे, गणेश गावडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली.
मागण्यांकडे वेधले लक्ष
महाग्रामसभेने केसरी कार्डधारकांना स्वस्त धान्य, शेतकऱ्यांना मोफत वीज, रोहयोतून शेतीची कामे करणे, वनहक्क पट्टे देणे, बोअरवेल देणे, उपजिल्हा रूग्णालय दर्जा व यंत्रसामग्री उपलब्ध करणे आदी मागण्यांकडे लक्ष वेधले.