अतिक्रमण काढताच संरक्षण भिंतीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:09 AM2018-11-28T01:09:16+5:302018-11-28T01:09:51+5:30
एटापल्ली पंचायत समिती समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोमवारपासून तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली पंचायत समिती समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोमवारपासून तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले आहे.
पंचायत समितीच्या परिसरात काही नागरिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. सदर जागा पंचायत समितीची असली तरी मागील अनेक वर्षांपासून दुकाने होती. त्याचबरोबर काही नागरिकांनी पक्के बांधकामही केले होते. त्यामुळे सदर जागा आपल्याच मालकीची असल्याचे दुकानदार सांगत होते. अतिक्रमण हटवितेवेळी सुरूवातीला दुकानदारांनी पंचायत समिती प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या दबावाला न जुमानता पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी रविवारी अतिक्रमण हटवियाची कारवाई केली.
अतिक्रमण हटवून ती जागा मोकळी केल्यानंतर त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण वाढते हा आजपर्यंतचा अनुभव आहे.
हे लक्षात घेऊन अतिक्रमण काढल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी पंचायत समिती प्रशासनाने संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात केली. यासाठी खोदकाम केले जात आहे. लवकरच बांधकामालाही सुरूवात होणार आहे.
युवकांवर बेरोजगारीचे संकट
पंचायत समितीमध्ये विविध कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक येत होते. त्यामुळे पंचायत समिती परिसरात हॉटेल, पानठेले, चहाचे दुकान व इतर किरकोळ दुकाने थाटण्यात आली होती. या दुकानातून मिळणाºया मिळकतीतून प्रपंच भागत होता. मात्र प्रशासनाने अतिक्रमण हटविल्याने हे दुकानदार बेरोजगार झाले आहेत. त्यांना पुन्हा व्यवसायासाठी नवीन जागा किंवा काम शोधावे लागणार आहे.