केरळसाठी सीआरपीएफकडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:17 AM2018-08-25T01:17:00+5:302018-08-25T01:18:13+5:30
जिल्ह्यात स्थित सीआरपीएफच्या पाचही बटालियनच्या अधिकारी व जवानांनी साडेसहा लाख रूपयांचा निधी जमा करून तब्बल दोन ट्रक इतके दैनंदिन जीवनावश्यक साहित्य केरळाला पाठविले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात स्थित सीआरपीएफच्या पाचही बटालियनच्या अधिकारी व जवानांनी साडेसहा लाख रूपयांचा निधी जमा करून तब्बल दोन ट्रक इतके दैनंदिन जीवनावश्यक साहित्य केरळाला पाठविले आहेत. यामध्ये जीवनाश्यक साहित्याचे दोन हजार पॉकेट बनविण्यात आले. यामध्ये पुरूषांसाठी एक हजार व महिलांसाठी एक हजार पॉकेटचा समावेश आहे.
साहित्य भरलेल्या सहा ट्रकांना शुक्रवारी येथील एमआयडीसी स्थित सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरिक्षक डॉ. टी. शेखर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. याप्रसंगी सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जिजाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी के. डी. जोशी, टी. के. सोलंखी, कुलदीपसिंह खुराना, उपकमांडंट कैलास गंगावणे, सपन सुमन, डॉ. रवी किरण हजर होते.
जमा करण्यात आलेल्या साडेसहा लाख रूपयांच्या निधीतून साहित्य खरेदी करण्यात आली. या साहित्याचे दोन हजार पॉकेट तयार करण्यात आले. या पॉकेटमध्ये महिलांसाठी गाऊन एक हजार नगर, टॉवेल दोन हजार नग, लुंगी एक हजार, कोलगेट पेस्ट दोन हजार नग, टुथब्रश दोन हजार नग, शाम्पू आठ हजार नग, डेटाल साबून दोन हजार नग, प्रो एक्स्ट्रा लार्ज एक हजार नग, रिम साबून दोन हजार नग, खोबरेल तेल दोन हजार बॉटल, मॉर्टिन दोन हजार नग, बिस्केट दोन हजार पॉकीट व महिलांसाठी टिकलीचे एक हजार पॉकेट आदी साहित्य पाठविण्यात आले.
सहकार्यासाठी चमू पाठविली
केरळ राज्यात पूर परिस्थितीमुळे अनेकांचे घरे जमीनदोस्त झाले. या पूरग्रस्तांना घर बनविणे, कपडे शिवणे, विद्युत फिटींग आदी कामांसाठी प्लम्बर, कारपेंटर, टेल्लर व ईलेक्ट्रीक टेक्निशीयन आदींची चमू केरळला पाठविण्यात आली आहे. यात सीआरपीएफचे १५ ते २० जवाना सहभागी आहेत.