नक्षल्याच्या आजारी मुलास उपचारासाठी मदत
By admin | Published: April 23, 2017 01:29 AM2017-04-23T01:29:59+5:302017-04-23T01:29:59+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी विविध
खाकीतील माणुसकी कायम : पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल
धानोरा : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी विविध गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाच अभियानाअंतर्गत धानोरा पोलिसांनी नक्षल दलम उपकमांडरच्या आजारी मुलास धानोरा व गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात भरती करून माणुसकीचा परिचय दिला.
नक्षलविरोधी अभियानादरम्यान धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील मर्केगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान गावातील प्रदीप रैनू दुगा हा ७ वर्षीय मुलगा खूप दिवसांपासून आजारी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. अधिक चौकशी केली असता सदर आजारी मुलगा हा टिपागड नक्षल दलमचा उपकमांडर पंकज ऊर्फ रैनू बहादूर दुगा यांचा असल्याचे समजले. नक्षल दलम उपकमांडरचा मुलगा असल्याबाबतचा कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी प्रदीप दुगा याला औषधोपचारासाठी प्रथम धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले. येथे त्याच्यावर उपचार करण्यात आला.
पुढील उपचारासाठी प्रदीपला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी निदानाअंती प्रदीप दुगा याला सिकलसेल हा आजार असल्याचे नि:ष्पन्न झाले. डॉक्टरांच्या मदतीने प्रदीपवर उपचार सुरू आहे. नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्यांच्या कुटुंबाविषयी पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)