गुणवंतांना शिक्षणासाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2017 02:07 AM2017-03-12T02:07:10+5:302017-03-12T02:07:10+5:30
शैक्षणिक २०१६-१७ पासून राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेशीत नसलेल्या अनुसूचित जाती
६० टक्क्यांवर गुण आवश्यक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
देसाईगंज : शैक्षणिक २०१६-१७ पासून राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेशीत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांकरिता भोजन, निवास व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच पदवी व पदविका परीक्षेमध्ये ६० टक्क्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेंतर्गत इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर शिक्षण मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर या ठिकाणी राहून शिक्षण घेण्यासाठी भोजन भत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार, निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ६० हजार रूपयांच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. क वर्ग महानगर पालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भोजनभत्ता २८ हजार, निवास भत्ता १५ हजार व निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ५१ हजार रूपये, तसेच उर्वरित ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार व निर्वाह भत्ता ६ हजार असे एकूण ४३ हजार रूपयांचे अनुदान विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना साहित्य खरेदीसाठी प्रती वर्ष पाच हजार रूपये व अन्य शाखेतील २० हजार रूपये मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
दिव्यांगासाठी सवलत
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये या योजनेत सवलत देण्यात आली आहे. ५० टक्के गुण असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. १६ मार्च २०१७ ही लाभ घेण्याची अंतिम तारीख आहे.