कोल्हापुरातील महापुराच्या धर्तीवर विदर्भात मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 12:00 PM2020-09-04T12:00:49+5:302020-09-04T12:01:35+5:30
भाजपा सरकारने ज्याप्रमाणे ६ जीआर काढून शेतकरी, गावकरी व गरीबांना भरीव मदत केली, त्याच आधारावर विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या काळात नागरिकांना मदत मिळावी याकरिता भाजपा सरकारने ज्याप्रमाणे ६ जीआर काढून शेतकरी, गावकरी व गरीबांना भरीव मदत केली, त्याच आधारावर विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
गुरूवारी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील सावंगी, आमगाव आणि देसाईगंज शहरातील पूरग्रस्त भागात पाहणी केल्यानंतर त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी भंडारा जिल्ह्यातही पूरग्रस्ता भागाचा दौरा केला.
गेल्यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले असता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली होती. आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आपले शब्द पाळावे आणि त्याप्रमाणे मदत जाहीर करावी अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे विदर्भ संघटन प्रमुख डॉ.उपेंद्र कोठेकर, माजी राज्यमंत्री परिणय फुके, गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.