मरेगावातील हेमाडपंथी शिवमंदिर जीर्णावस्थेत
By admin | Published: March 24, 2017 01:17 AM2017-03-24T01:17:17+5:302017-03-24T01:17:17+5:30
गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. वडधापासून सात किमी अंतरावर
पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : पुरातन कलाकृती नष्ट होण्याचा धोका
वडधा : गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. वडधापासून सात किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे.
सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भूयार जात असून तो भूयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघतो. वैरागड ते मरेगावचे अंतर २५ किमी आहे. रामाला १४ वर्षांचा वनवास झाला. तेव्हा याच भुयारातून जात असल्याच्या आख्यायिका या मंदिरामध्ये सांगितल्या जातात. ४५ ते ५० वर्षांपूर्वी या भुयारातून शिरलेली शेळी सरळ वैरागडच्या किल्ल्यात निघली होती, असेही सांगितले जाते. या मंदिराच्या आख्यायिका अनेक सांगितल्या जात असल्या तरी सदर मंदिर पुरातन काळातील शिल्पकलेचा बेजोड नमुना मानला जातो. येथील दगडांवर अनेक प्रकारच्या मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत. मात्र देखभाल व दुरूस्तअभावी या मंदिरावरील दगड हळूहळू कोसळत चालले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)