हेमाडपंती शिवमंदिर जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:36 AM2021-07-31T04:36:56+5:302021-07-31T04:36:56+5:30

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व ...

Hemadpanti Shiva temple in dilapidated condition | हेमाडपंती शिवमंदिर जीर्णावस्थेत

हेमाडपंती शिवमंदिर जीर्णावस्थेत

Next

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून, ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, असे सांगितले जाते.

उपाहारगृहांमधील पदार्थ उघड्यावर विक्रीला

गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे; मात्र याकडे अन्न व पुरवठा विभागातर्फे कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

खासगी रुग्णालयात पार्किंगची साेय नाही

गडचिराेली : शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आहेत; मात्र यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगर परिषदेने रुग्णालय प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई करणारे नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

सांडपाणी अडल्याने आरोग्य धोक्यात

आरमाेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

जळाऊ लाकडाचा पुरेसा पुरवठा नाही

अहेरी : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात; पण वन कायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. नागरिकांना जळाऊ लाकूड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

‘बीएसएनएल’ची सेवा ठरली कुचकामी

झिंगानूर : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्यावतीने सिराेंचा तालुक्याच्या झिंगानूर भागात दूरसंचार सेवा दिली जाते; मात्र गेल्या काही महिन्यांपासून कव्हरेजची समस्या माेठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने भ्रमणध्वनीधारकांचा एकमेकांशी संपर्क हाेत नाही. परिणामी, बीएसएनएलची सेवा या भागात कुचकामी ठरली आहे.

लाइनमन नसल्याने ग्रामस्थांची अडचण

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते, तसेच एका लाइनमनकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत.

तुटलेले साईन बोर्ड दुरुस्तीची मागणी

सिराेंचा : तालुक्यातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे; मात्र ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकावर लिहिलेली अक्षरे मिटल्याने अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे. वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही साईन बाेर्ड लावण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, वाहनधारकांची बरेचदा फसगत हाेत असल्याचे दिसून येत आहे.

योजनांच्या माहितीसाठी केंद्र निर्माण करा

कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुका स्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

गडचिरोली : कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम थंडावले

गडचिरोली : गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारने घेतला होता; मात्र आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम अद्यापही थंड बस्त्यात आहे. शासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे गडचिराेली जिल्हावासीयांना आकाशवाणी केंद्राची प्रतीक्षाच दिसून येते.

गडचिरोली-पेंढरी मार्गावर बसफेऱ्या अत्यल्प

धानोरा : गडचिरोली आगारातून पेंढरी मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांकडून केली जात आहे. गडचिरोलीवरून एटापल्ली-अहेरीकडे जाण्यासाठी गडचिरोली-कारवाफा-पेंढरी हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर बसफेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गरोदर मातांना बुडीत मजुरी देण्याची मागणी

सिरोंचा : गरोदर मातांना शासनाकडून बुडीत मजुरी दिली जाते; मात्र जिल्ह्यातील मातांना ही मजुरी देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. महिला रुग्णालयात चकरा मारत आहेत. ही मजुरी तत्काळ देण्याची मागणी होत आहे. काही महिलांना एक ते दीड वर्षांपासून बुडीत मजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे महिला अद्यापही वंचित आहेत.

शहरातील अनेक वॉर्डात सट्टापट्टी जोमात

गडचिरोली : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत; मात्र याकडे गडचिरोली पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.

घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला

गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून सळी, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्यांचे भाव प्रचंड वधारले आहेत. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे.

पशू योजनांबाबत जनजागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात; मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे.

मूल मार्गावरील बसफेऱ्या वाढवा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक मूल, चंद्रपूरला ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच प्रवाशांची वर्दळ राहते. त्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. परिणामी, नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. आता अनलाॅक झाल्यापासून विवाह साेहळे सुरू झाले आहेत. परिणामी, प्रवाशांची संख्या वाढल्याने बसफेऱ्यांची गरज आहे.

अर्धवट पुलावरून खडतर प्रवास

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. या भागातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापावे लागते, त्यामुळे पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Hemadpanti Shiva temple in dilapidated condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.