सासू व नातेवाईकांकडून सुनेला जबर मारहाण, पती फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:49 PM2017-08-06T23:49:08+5:302017-08-06T23:49:51+5:30
स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत प्रियदर्शनी गावातील विवाहित महिलेस सासू, जाऊ, पतीचा मेहुणा व त्याच्या पत्नीने जबर मारहाण करून .....
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत प्रियदर्शनी गावातील विवाहित महिलेस सासू, जाऊ, पतीचा मेहुणा व त्याच्या पत्नीने जबर मारहाण करून अंगावर ठिकठिकाणी चावा घेतल्याने विवाहित महिलेला गंभीर अवस्थेत असताना येथील पोलीस पाटील सदाशिव नैताम व काही नागरिकांनी आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी सासूसह चौघांना अटक केली असून पती फरार आहे.
मनिषा संतोष कुळमेथे (२५) रा. प्रियदर्शनी असे गंभीर जखमी पीडित विवाहित महिलेचे नाव आहे. मनिषाचे लग्न संतोष सन्याशी कुळमेथे याचेशी २०१३ मध्ये झाले. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. दरम्यान सासू कमलाबाई हिच्या सांगण्यावरून सून मनिषा हिला पती संतोष हा मारझोड करू लागला. त्यावेळी मनिषाने चामोर्शीच्या महिला तक्रार निवारण मंचाकडे २०१५ मध्ये तक्रार दाखल केली. येथे दोघांनाही बोलावून त्यांच्यात समझोता करून देण्यात आला. त्यानंतर पती-पत्नी दोघेही एकत्र राहू लागले. संतोषच्या आईच्या सांगण्यावरून पती-पत्नी नेहमी भांडण व मारहाणीचे प्रकरण घडत होते. त्यामुळे पीडित मनिषा आपल्या पतीसोबत स्वतंत्र राहत होती. दोन महिन्यांपूर्वी पती संतोष कुळमेथे घरातून निघून गेला. मनिषाने आष्टी पोलीस ठाणे गाठून पती फरार झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला तक्रार निवारण मंच गडचिरोली येथे सुध्दा तक्रार दिली. मंचाच्या वतीने ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्या विरोधात नोटीस बजाविण्यात आली. सदर नोटीस पाहताच शनिवारी सायंकाळी मनिषाची सासू, जाऊ, पतीचा मेहुणा व त्याची पत्नी या सर्वांशी मनिषाशी भांडण करून मनिषास जबर मारहाण केली. पतीचा मेहुणा निलकंठ कन्नाके याने चावा घेतला. मनिषा बेशुध्द झाल्यावर हे सारेजण तेथून निघून गेले. त्यानंतर गावातील पोलीस पाटील सदाशिव नैताम व काही नागरिकांनी मनिषाला ग्रामीण रूग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल केले व पोलिसांत तक्रार दिली.
आरोपींमध्ये सासू कमलाबाई सन्याशी कुळमेथे, निलकंठ कन्नाके, वंदना कन्नाके, सुनंदा साईनाथ कुळमेथे यांचा समावेश आहे. या सर्वांनी मनिषा गावात कशी राहते, असे म्हणत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून तसेच पीडित मनिषा हिच्या बयानावरून या सर्व आरोपीविरोधात आष्टी पोलिसांनी गुन्हा नोंद दाखल केला. चारही आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दीपक लुकडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
मनिषाला मारहाण करणाºया सदर आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील नैताम, माजी जि.प. सदस्य राजू यांनी केली आहे.