इकडे कन्येने जन्म घेतला, अन् तिकडे पित्याने प्राण साेडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 07:45 AM2022-11-29T07:45:00+5:302022-11-29T07:45:02+5:30
Gadchiroli News कुटुंबात एका कन्येने जन्म घेतला आणि काही वेळातच तिकडे तिच्या पित्याने प्राण सोडला. त्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रमेश मारगोनवार
गडचिरोली : कोणाच्या घरात नवीन जीवाचे आगमन झाले की त्याचा आनंद सर्वांचाच असतो. पण भामरागडमधील गुडीपाका कुटुंबीयांसाठी हा आनंद औटघटकेचा ठरला. या कुटुंबात एका कन्येने जन्म घेतला आणि काही वेळातच तिकडे तिच्या पित्याने प्राण सोडला. त्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेतील पिता रवी शिवराम गुडीपाका (३३ वर्ष) हे सिरोंचा नगरपंचायतमध्ये लिपिक पदावर कार्यरत होते.
रवी यांचा विवाह २० एप्रिल २०१८ रोजी झाला. पत्नी ममता यांच्यासोबत त्यांचा संसार अतिशय व्यवस्थित सुरू होता. या दाम्पत्याला पहिला मुलगा आहे. तीन-चार दिवसांपूर्वी रवी अचानक चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मुका मार लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू होते.
दरम्यान, त्यांच्या पत्नी ममता यांची दुसऱ्यांदा प्रसुतीची वेळ जवळ आल्याने २६ नोव्हेंबरला (शनिवारी) त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच दिवशी दुपारी १.३० च्या सुमारास रवी हे पुन्हा चक्कर येऊन कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण ते शुद्धीवर येत नव्हते. अशातच संध्याकाळी ५.२० च्या सुमारास ममता यांची प्रसुती होऊन त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र मुलीचे मुख पाहू न शकलेल्या पित्याला त्याआधीच प्राण सोडावे लागले.
त्यांचा आनंद ठरला औटघटकेचा
एका मुलानंतर झालेल्या मुलीमुळे कुटुंबाला परिपूर्णता आली अशा आनंदात गुडीपाका कुटुंबीय होते. पण त्यांचा हा आनंद नियतीला मान्य नव्हता. इकडे मुलीच्या जन्मापासून बेखबर असलेल्या बेशुद्धावस्थेतील रवी यांना डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अहेरी येथे नेण्याचा सल्ला दिला. संध्याकाळी ६.३० वाजता रुग्णवाहिकेने अहेरीसाठी निघाले आणि रात्री ८ च्या सुमारास अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले, पण डॉक्टरांनी त्यांना तपासताच मृत घोषित केले.
दोन कुटुंबांचा तुटला आधार
भामरागड ग्रामपंचायत असतानापासून रवी गुडीपाका हे अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. नगरपंचायत झाल्यानंतर त्यांना स्थायी सेवेत घेण्यात आले. एक होतकरू तरुण म्हणून ते ओळखले जायचे. विशेष म्हणजे त्यांच्या सासरकडील कुटुंबात (गदाबाई वागू पुल्लीवार, रा.मुलचेरा यांना) एकच मुलगी असल्यामुळे त्यांच्यासाठीही जावई रवी हेच आधार होते. अशा अवस्थेत रवी यांच्या अशा आकस्मिकरित्या झालेल्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबाचा आधार तुटला आहे. रवीच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, मुलगा, नवजात मुलगी आणि भाऊ असा आप्त परिवार आहे.