वीर समाज जगतोय यातनामय जीवन
By admin | Published: November 16, 2014 10:51 PM2014-11-16T22:51:02+5:302014-11-16T22:51:02+5:30
रोजगारासाठी तीन पिढ्यांपूर्वीच आंध्रप्रदेशातून विदर्भात स्थलांतरीत झालेल्या वीर समाजाला शासनाने जात प्रमाणपत्र देण्याचे नाकारले आहे. त्याचबरोबर या समाजातील बहुतांश नागरिक भीक मागून
मिलींद मेडपीलवार - तळोधी (मो.)
रोजगारासाठी तीन पिढ्यांपूर्वीच आंध्रप्रदेशातून विदर्भात स्थलांतरीत झालेल्या वीर समाजाला शासनाने जात प्रमाणपत्र देण्याचे नाकारले आहे. त्याचबरोबर या समाजातील बहुतांश नागरिक भीक मागून जगत असले तरी त्यांचा बीपीएल यादीमध्ये समावेश नसल्याने शासकीय योजनांचा लाभही मिळत नाही. परिणामी या समाजाला यातनामय जीवन कंठावे लागत आहे.
वीर समाज हा मुळचा आंध्रप्रदेशातील निजामाबाद जवळील काटेपल्ली येथील आहे. निजामशाहीच्या काळात या समाजावर फार मोठे अन्याय व अत्याचार करण्यात आले. निजामाच्या अत्याचारांना त्रासून वीर समाजाचे नागरिक आंध्रप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतरीत झाले. वीर समाजाचे सायप्पा, मकेवार, मिरेवार, हजारे, गुंटीवार, मेडपल्लीवार आदी कुटुंब चामोर्शी तालुक्यातील विसापूर येथे स्थायीक झाले. मागील तीन पिढ्यांपासून हे कुटुंब याच ठिकाणी वास्तव्यास आहे.
वीरभद्र समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश आहे. वीरभद्र हे वीर समाजाचे कुलदैवत आहे. मात्र शासनाने वीर व वीरभद्र हे वेगळे समाज असल्याचे शासनाने घोषित करून वीर समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. जात प्रमाणपत्र नसल्याने खुल्या प्रवर्गात या समाजातील युवकांना स्पर्धा करणे कठीण जात आहे. परिणामी या समाजातील युवक नोकऱ्यांपासून वंचित आहेत. भीक मागून जगत असले तरी बीपीएलमध्ये या नागरिकांची नावे नाहीत. त्यामुळे एकाही शासकीय योजनेचा लाभ या नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत गरीबीतच जीवन कंठावे लागत आहे. सकाळी आंघोळ करून कमन कुंडल, घंटा व शंख घेऊन या समाजातील नागरिक भीक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात. शासनाने या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी समाजातील नागरिकांकडून होत आहे.