उच्चशिक्षित गुरूदेवला उपचारासाठी गरीबी ठरतेय शाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:04 PM2018-01-22T23:04:41+5:302018-01-22T23:05:42+5:30
कुकडी येथील गुरूदेव उमाजी टिकले या युवकाच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत.
आॅनलाईन लोकमत
विसोरा/तुळशी : कुकडी येथील गुरूदेव उमाजी टिकले या युवकाच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत. त्याला डायलिसीससाठी महिन्याचा ३० हजार रूपये खर्च येत असून गरीबीमुळे हा खर्च करणे त्याला अशक्य होत असल्याने समाजाकडून मिळणाºया मदतीकडे त्याची आस लागली आहे.
गुरूदेवचे पितृछत्र कुमारवयातच हरविल्याने उच्च शिक्षण घेण्याबरोबरच कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचा त्याचा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबासाठी गुरू व देव झाला. जिद्दी व आशावादी असलेल्या गुरूदेवने स्वत:च्या मेहनतीने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलली. मात्र बीएच्या अंतिम वर्षाला असताना त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्याने त्याचा जीवनासोबतचा संघर्ष आणखी वाढला. त्याला महिन्यातून जवळपास आठवेळा डायलिसीस करावे लागते. यासाठी प्रत्येक महिन्याला जवळपास ३० हजार रूपये खर्च येतो. उपचारासाठी यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयांची मदत मिळाली. देसाईगंज येथील मायक्रोटेक कॉम्प्युटरचे संचालक यांनीही बरीच मदत केली. मात्र उपचारादरम्यान सर्व निधी संपल्याने आता पुढे काय करावे, असा प्रश्न गुरूदेव समोर उभा ठाकला आहे. आई मोलमजुरी करते. गुरूदेवसोबतच दोन भाऊ व आजीचाही सांभाळ गुरूदेवच्या आईला करावा लागतो. किडणीचे प्रत्यारोपण केल्यास डायलिसीसचा खर्च येणार नाही. मात्र किडणी प्रत्यारोपणाचा खर्च साडेतीन लाख रूपये एवढा पैसा गुरूदेवजवळ नसल्याने समाजाकडून आर्थिक मदतीची आस गुरूदेव बाळगूण आहे. गुरूदेवचा स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा देसाईगंज येथील बँक खाता क्रमांक ३१५१५४६३३८५ हा असल्याचे कुटुंबांनी कळविले आहे.