महामार्गावर खासगी वाहनांचे अतिक्रमण वाढले
By admin | Published: October 22, 2016 02:05 AM2016-10-22T02:05:21+5:302016-10-22T02:05:21+5:30
गडचिरोली-नागपूर या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजुला खासगी प्रवासी वाहने दिवसभर उभी ठेवली जात आहेत.
आरमोरीतील स्थिती : अपघात वाढले, वाहनांमुळे रस्ते झाले अरूंद
आरमोरी : गडचिरोली-नागपूर या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजुला खासगी प्रवासी वाहने दिवसभर उभी ठेवली जात आहेत. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या वाहनांचे अतिक्रमण हळूहळू रस्त्याच्या मधोमध येऊ लागले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
आरमोरी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने या मार्गावरून मालवाहू ट्रक, प्रवासी वाहने, बस, दुचाकी यांची नेहमीच वर्दळ राहते. शहराच्या मध्यभागी बसथांबा आहे. बसथांब्यापासून किमान ३०० मीटर अंतरावर खासगी वाहने उभी करू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाचे असले तरी हा नियम आरमोरी येथे धाब्यावर बसविला जात आहे. कधीकधी तर काळीपिवळी वाहने ज्या ठिकाणी बस थांबते, त्याच ठिकाणी उभी ठेवून प्रवाशी भरतात. त्यामुळे बसथांब्यापासून काही दूर अंतर नेऊन थांबवावी लागते. आरमोरी येथील वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी महिला व पुरूष अशा दोन स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे वाहतूक पोलीस सदर वाहनांवर कोणतीही कारवाई करीत नाही. परिणामी वाहनचालकांची हिंमत वाढत चालली आहे. या वाहनांचे अतिक्रमण हळूहळू रस्त्यावर येत आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणावरून प्रवाशांची उचल सदर वाहनधारक करीत असल्याने या ठिकाणी दिवसभर किमान १० काळीपिवळी वाहनांचा ठिय्या आहे. (शहर प्रतिनिधी)
वाहतूक पोलीस व टॅक्सी चालकांचे साटेलोटे
दिवसभर वाहनांचा मुख्य मार्गावरच ठिय्या राहत असतानाही वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करीत नाही. वाहनांच्या अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरातून अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. यावरून काळीपिवळी वाहनचालक व वाहतूक पोलीस यांचे साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे.