लालपरी उलगडणार एसटीचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:17 AM2019-08-15T00:17:23+5:302019-08-15T00:17:59+5:30
गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील प्रवाशांच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा इतिहास उलगडणारे फिरते प्रदर्शन शुक्रवारी गडचिरोलीत येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील प्रवाशांच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा इतिहास उलगडणारे फिरते प्रदर्शन शुक्रवारी गडचिरोलीत येत आहे. परिवहनमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ‘बस फॉर अस’ फाऊंडेशनच्या वतीने त्यासाठी आकर्षक एसटी तयार करण्यात आली असून त्यात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
गडचिरोलीच्या आगारात १६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. गडचिरोली शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन एसटी बसचा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळातर्फे गडचिरोलीचे विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे यांनी केले आहे.
राज्य परिवहन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर बसगाडी कशी होती, मधल्या काळात तिचे स्वरूप कसे व आता बसगाडीत काय बदल करण्यात आले, हा संपूर्ण इतिहास या प्रदर्शनात राहणार आहे.