देसाईगंज शहरात मोकाट जनावरांचा हौदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:51+5:302021-07-07T04:45:51+5:30
देसाईगंज शहर हे व्यापारीदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण आहे. मुख्य राष्ट्रीय महामार्गाने लगतच्या छत्तीसगड,मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यांशी जोडल्या आहेत. या ...
देसाईगंज शहर हे व्यापारीदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण आहे. मुख्य राष्ट्रीय महामार्गाने लगतच्या छत्तीसगड,मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यांशी जोडल्या आहेत. या मार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. शहरातील अनेक मालक जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून देत असल्याने सदर जनावरे दिवसा भाजीपाला बाजारात टाकून दिलेल्या टाकाऊ भाजीपाल्यावर ताव मारण्यासह चक्क भाजीपाल्याच्या दुकानावर ही तुटून पडतात. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळेस हिच मोकाट जनावरे राष्ट्रीय महामार्गावर घोळक्याने बस्तान मांडून बसत असल्याने अनेकदा मुख्य मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होते. दरम्यान गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेने रुग्णाला अती तत्काळ सेवेत हलविण्यात येत असताना मुख्य मार्गावर बस्तान ठोकून बसलेल्या जनावरांमुळे मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे गंभीर रुग्णास वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितास धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान याबाबत स्थानिक नागरिकांनी ही बाब वारंवार नगर प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही व याबाबत लिखित तक्रारी करुन ही कुठलीच ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने या प्रती तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नगरप्रशासनाने या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेण्याची गरज आहे.