ग्रामस्थांनी केली तंबाखूजन्य पदार्थांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:15 AM2019-02-06T01:15:43+5:302019-02-06T01:16:13+5:30
मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने इंजेवाडा व पेटतुकुम येथील नागरिकांनी पानठेला व किराणा दुकानातील खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ जमा करून चौकात या साहित्याची होळी केली. यासंदर्भात दोन्ही गावात मुक्तिपथ गाव संघटनेमार्फत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने इंजेवाडा व पेटतुकुम येथील नागरिकांनी पानठेला व किराणा दुकानातील खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ जमा करून चौकात या साहित्याची होळी केली.
यासंदर्भात दोन्ही गावात मुक्तिपथ गाव संघटनेमार्फत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. तालुक्यातील इंजेवारी आणि पेठतुकूम येथील अहिंसक कृतीद्वारे गावातील पानठेले आणि किराणा दुकानातील सर्व तंबाखूजन्य पदार्थ एकत्र करून त्याची सामूहिक होळी केली. इंजेवारी आणि पेठतुकूम या गावांमध्ये पानठेला आणि किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्रा आणि इतरही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात होती. या पदार्थाच्या सेवनाचे आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम मुक्तिपथ तालुका चमूने वारंवार गावकऱ्यांना समजावून सांगितले. गावातील युवकही या पदार्थाच्या आहारी जात आहे. त्यामुळे काहीच दिवसांपूर्वी मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थ हद्दपार करण्यासाठी या पदार्थांची विक्री पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गावातील पानठेलाधारक आणि खर्रा विक्री करणाऱ्या किराणा दुकानदारांना तंबाखूजन्य पदार्थांची विल्हेवाट लावण्याबाबत नोटीस दिली. यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. पण यानंतरही नियमांचे उल्लंघन करून या पदार्थांची विक्री सुरूच असल्याने मुक्तिपथ गाव संघटनेने गावकऱ्यांच्या सहकार्याने सोमवारी सामूहिक कृतीद्वारे गावातील सर्व पानठेल्यावरील आणि किराणा दुकानातील सर्व तंबाखूजन्य साहित्य एकत्र करून त्याची सामूहिक होळी केली. यानंतरही विक्री सुरूच ठेवल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागात युद्धपातळीवर जनजागृती सुरू
गडचिरोली जिल्हा व्यसनमुक्त बनविण्यासाठी मुक्तिपथ संघटनेच्या माध्यमातून आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, गावागावात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. तंबाखू व दारू व्यसनाचे दुष्परिणाम नागरिकांपुढे मांडले जात आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही जनजागृती सुरू आहे.