गुगल मॅपवर मिळेल घरांचे लोकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:28 AM2018-02-10T00:28:00+5:302018-02-10T00:28:24+5:30

गडचिरोली व देसाईगंज शहरातील मालमत्तेचे जीआयएस (जीओग्रॉफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) द्वारे सर्वे केला जात आहे. सदर सर्वे कर पुनरआकारणीसाठी असला तरी या सर्वेतून गोळा झालेला डेटा गुगल मॅपवर टाकला जाणार आहे.

Home location will be found on Google map | गुगल मॅपवर मिळेल घरांचे लोकेशन

गुगल मॅपवर मिळेल घरांचे लोकेशन

googlenewsNext
ठळक मुद्देमालमत्ता कराचे फेरमूल्यांकन सुरू : गडचिरोली व देसाईगंज शहरांचे जीआयएसद्वारे सर्वेक्षण

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली व देसाईगंज शहरातील मालमत्तेचे जीआयएस (जीओग्रॉफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) द्वारे सर्वे केला जात आहे. सदर सर्वे कर पुनरआकारणीसाठी असला तरी या सर्वेतून गोळा झालेला डेटा गुगल मॅपवर टाकला जाणार आहे. प्रत्येक घराची स्वतंत्र आयडेंटिटी बनविली जात असल्याने गुगल मॅपवर घराचे नाव टाकल्याबरोबर संबंधित घराचे लोकेशन उपलब्ध होणार आहे.
नगर परिषद हद्दीतील मालमत्तेची दर चार वर्षांनी फेर करनिर्धारण केले जाते. यापूर्वी नगर परिषदेचे कर्मचारी प्रत्येक घराचे साध्या मोजपट्टीने मोजमाप करून करनिर्धारण करीत होते. बऱ्याचवेळा मालमत्ताधारक संबंधित कर्मचाऱ्याला शे-दोनशे रूपये देऊन घराचा आकार कमी नोंदवायला सांगत होते. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकाचा कर वाचत असला तरी नगर परिषदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वे करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या महाआयटी विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील नगर परिषदांमधील मालमत्तेच्या सर्वेला सुरूवात झाली आहे. सर्वे करण्याचे काम एस-२ इन्फोटेक कंपनीला देण्यात आले असून या कंपनीने गडचिरोली शहरात २१ तर देसाईगंज शहरात १५ कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, परवानगीपत्र देण्यात आले आहे. सदर कर्मचारी मागील पाच दिवसांपासून प्रत्येक घरी जाऊन घराचा सर्वे करीत आहेत. सर्वे करते वेळी संबंधित घराचा अ‍ॅड्राईड मोबाईलच्या सहाय्याने समोरून व दोन्ही बाजूने फोटो काढला जात आहे. त्याचबरोबर डिस्टोमीटर मशीनच्या सहाय्याने घराचे मोजमाप केले जात आहे. डिस्टोमीटर मशीनमध्ये लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असल्याने घराचे तंतोतंत मोजमाप होणार आहे. कच्चा घर, पक्का घर, पूर्ण पक्का घर, टिनाचा शेड अशा चार भागांमध्ये घरांचे वर्गीकरण करण्यात येत आहे. घराचा आकार व प्रकार यावरून करनिर्धारण केले जाणार आहे. जे घर बंद स्थितीत आढळले त्या घराला नोटीस चिकटविले जात आहे. सध्यास्थितीत फुले वॉर्डापासून सुरूवात झाली आहे. बाहेरून घराचे मोजमाप करण्याबरोबरच घरातील प्रत्येक खोलीचीही पाहणी केली जात आहे. त्यामुळे संबंधित घरात नेमक्या किती खोल्या आहेत. तळमजला आहे काय, घर दुमजली आहे काय हे कळण्यास मदत होणार आहे.
गोळा केलेली माहिती नगर परिषदेकडे आॅनलाईन उपलब्ध राहणार आहे. त्याचबरोबर करनिर्धारणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संंबंधित घराचे लोकेशन गुगल मॅपवर टाकले जाणार आहे. त्यामुळे शहरात एखाद्याचे घर शोधायचे असल्यास यापुढे कुणाला विचारण्याची गरज पडणार नाही. गुगल मॅपच आपल्याला संबंधित घराचे लोकेशन उपलब्ध करून देणार आहे. सध्यास्थितीत गुगल मॅपवर काही निवडक लोकांच्या घराबाबतचीच माहिती आहे. घरांचे चित्र सॅटेलाईटच्या माध्यमातून काढले असल्याने घरांचा फक्त वरच भाग दिसतो. त्याचबरोबर शहरातील रस्ते स्पष्ट दिसतात. मात्र घराचे चित्र स्पष्ट दिसत नाही. यानंतर संबंधित घराच्या तीन बाजूचे चित्र टाकले जाणार असल्याने सदर घर ओळखण्यासही मदत होणार आहे. यामुळे शहरातील प्रत्येक घर आता गुगल मॅपच्या नकाशावर दिसणार आहे.
सध्यास्थितीत नगर परिषद अंतर्गत सर्वे सुरू आहे. यानंतर नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या शहरांचा सर्वे केला जाणार आहे. सध्याच्या सर्वेवरून नगर रचना व करनिर्धारण विभाग कर ठरविणार आहे. कराबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित नागरिकाला सर्वप्रथम कर रचना विभागाकडे सुनावणी होणार आहे. त्यानंतर दुसरी अंतिम सुनावणी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडून केली जाणार आहे. या समितीने दिलेला निर्णय अंतिम राहणार आहे.

सर्वे सक्तीचा
काही नागरिक घराचा सर्वे करू देण्यास टाळाटाळ करीत आहेत. जे नागरिक सर्वे करू देण्यास नकार देत आहेत. तशी नोंद सर्वे करणारे कर्मचारी करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पोलिसांची मदत घेऊन सर्वे केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सर्वेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोलीचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांंनी केले आहे.

या बाबींची केली जात आहे पाहणी
सर्वे करणारे कर्मचारी, खोल्यांची संख्या, स्वयंपाक घरांची संख्या, स्वच्छतागृहांची संख्या, स्नान गृहांची संख्या, नळ जोडणी, सोलर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ड्रेन सेप्टी टँक, जाहिरात, मोबाईल टॉवर, वीज जोडणी आदी बाबतची पाहणी केली जाणार आहे.
प्रत्येक घराची युनिक आयडी बनविली जाणार आहे. यामध्ये संबंधित घराला विशिष्ट क्रमांक दिला जाईल. त्याचबरोबर इमारतीचे नाव, जवळचा मार्ग, जवळचे एखादे महत्त्वाचे ठिकाणसुद्धा नमूद केले जाणार आहे. हीच माहिती पुढे गुगल मॅपवर टाकली जाणार आहे.
यापूर्वी घर बांधणीच्या परवानगीसाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवावे लागत होते. आता मात्र घराच्या परवानगीचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

Web Title: Home location will be found on Google map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.