शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना शेतीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवणार : गृहमंत्री वळसे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 03:00 PM2021-11-15T15:00:11+5:302021-11-15T16:38:54+5:30
नक्षलविरोधी अभियानात नक्षल्यांसीबत लढताना शहीद झालेल्या शहीद पोलीस कुटुंबियांना शेतीसाठी ५ एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानात नक्षल्यांसीबत लढताना शहीद झालेल्या पोलीस कुटुंबीयांना शेतीसाठी पाच एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज शहीद कुटुंबीयांना दिली.
चकमकीत सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी आणि सी-६० कमांडोंच्या सत्कारासाठी ना.पाटील आज गडचिरोलीत आले होते. यावेळी त्यांनी शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्या कुटुंबीयांनी अनुकंपावरील नोकरीसाठी अनेक दिवसांपासून वाट पहात असल्याची व्यथा मांडली.
लष्करी सेवेच्या धर्तीवर शहीद सी-६० जवानांच्या कुटुंबियांनाही शेतीसाठी पाच एकर जागा द्यावी, तसेच या कुटुंबीयांना घर टॅक्स माफ करावा, अशा मागण्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आल्या. त्या सर्व मागण्यांचा संयुक्त प्रस्ताव तयार करून पाठवावा, अशी सूचना ना.वळसे पाटील यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना केली. तो प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवला जाईल, असे पाटील म्हणाले.
यावेळी अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक (अभियान) छेरिंग दोरजे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एएसपी (प्रशासन) समीर शेख, एएसपी (अभियान), सोमय मुंडे, एएसपी अनुज तारे आदी उपस्थित होते.