बसवाहकाचा प्रामाणिकपणा : परत केले गडचिरोली-नागपूर बसमध्ये पडलेले ५० हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 09:56 AM2017-11-13T09:56:04+5:302017-11-13T09:57:07+5:30
सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सिरोंचा नागपूर या बसमधे पडलेले ५० हजार रुपयांचे बंडल बस वाहकाच्या प्रामाणिक व सचोटीने संबंधित व्यक्तीला परत मिळण्याची घटना आलापल्ली बसस्थानकावर घडली.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली-रस्त्यावर पडलेले पैसे उचलून संबंधित व्यक्तीला वा पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या अनेक घटना आपण वाचतो. मात्र कित्येकदा लोकांचे असे हरवलेले वा खाली पडलेले पैसे परत मिळतातच असे नाही. मग ती रक्कम ५० हजारांची असेल तर परत मिळण्याची शक्यताही कमीच असते. मात्र सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सिरोंचा नागपूर या बसमधे पडलेले ५० हजार रुपयांचे बंडल बस वाहकाच्या प्रामाणिक व सचोटीने संबंधित व्यक्तीला परत मिळण्याची घटना आलापल्ली बसस्थानकावर घडली.
सोमवारी सकाळी सिरोंचाहून नागपूरकडे येणाऱ्यां बसमध्ये राकेश केशवराव अलोने हे प्रवास करीत होते. त्यांना चंद्रपूरपर्यंत जायचे होते. चंद्रपूरला जाण्यासाठी ते घाईने खाली उतरून गेल्यावर त्यांच्या सीटवर पडलेले ५० हजार रुपयांचे बंडल बसचे वाहक मनोज माणिकराव बाकडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ते ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राकेश अलोणे हे त्या जागेवर बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत अलोणे बसस्थानक सोडून निघून गेले होते. ते पैशासाठी निश्चित परत येतील असा कयास बांधून बसवाहक बाकडे यांनी बस आलापल्ली स्थानकावरच थांबवण्याचा निर्णय घेतला. तब्बल १५ ते २० मिनिटे त्यांनी प्रतिक्षा केल्यानंतर अलोणे हे परत बसस्थानकावर आले. त्यावेळी त्यांचे पैसे त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. आपले हरवलेले पैसे इतके व्यवस्थित व सुरक्षित ठेवल्याचे पाहून त्यांना आनंद व आश्चर्याचा धक्का बसला.