गडचिरोलीच्या अभियंत्यावर नागपुरात हनी ट्रॅप; पत्रकार, पोलिसासह पाच जण जेरबंद

By संजय तिपाले | Published: January 29, 2024 05:46 PM2024-01-29T17:46:07+5:302024-01-29T17:47:11+5:30

पोलिस अंमलदार सुशील गवई हा देखील हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीसाठी काम करायचा, त्यानेही हे प्रकरण मिटविण्यासाठी अभियंत्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली.

Honey Trap in Nagpur on Engineer from Gadchiroli Journalists five people including the police were jailed | गडचिरोलीच्या अभियंत्यावर नागपुरात हनी ट्रॅप; पत्रकार, पोलिसासह पाच जण जेरबंद

गडचिरोलीच्या अभियंत्यावर नागपुरात हनी ट्रॅप; पत्रकार, पोलिसासह पाच जण जेरबंद

गडचिरोली : येथील एका सहायक अभियंत्याला 'कॉलगर्ल'च्या माध्यमातून 'हानीट्रॅप'मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार २९ जानेवारीला उजेडात आला. नागपुरातील एका पत्रकार, पोलिस अंमलदारासह पाच जणांना गडचिरोली गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आरोपींत दोन महिलांचा समावेश आहे.

गडचिरोली येथे एक सहायक अभियंता कार्यरत आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात एका कॉल गर्लसोबत हे अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमध्ये दोघांनी सोबत वेळ घातला, त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली. दरम्यान, या कॉल गर्लने नंतर ही माहिती तिच्या ओळखीचा कथित पत्रकार रविकांत कांबळे यास दिली. त्याने अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितली, तर पोलिस अंमलदार सुशील गवई हा देखील हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीसाठी काम करायचा, त्यानेही हे प्रकरण मिटविण्यासाठी अभियंत्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली.

मागील महिनाभरापासून आरोपींनी अभियंत्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. यामुळे त्रस्त अभियंत्याने रविवारी गडचिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी  गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी  व चमू रवाना केला. सोमवारी नागपूर येथे सापळा रचून टोळीचा पर्दाफाश केला. आरोपींना गडचिरोलीत आणले असून कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
 
आरोपींमध्ये यांचा समावेश
कथित पत्रकार रविकांत कांबळे, पोलिस अंमलदार सुशील गवई, रोहित अहिर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या तिघांसह एक महिला असे चौघे ताब्यात आहेत, तर एक महिला आरोपी आहे. 
 
अनेकांना जाळ्यात ओढल्याचा संशय
दरम्यान, या टोळीत कॉल गर्लसह पोलिस व पत्रकार यांचा समावेश आढळला आहे. नियोजनबद्धपणे सावज जाळ्यात ओढून नंतर ब्लॅकमेल करत खंडणी उकळण्याचा धंदाच या टोळीने मांडला होता, पण बदनामीच्या भीतीने अनेकजण तक्रार देण्यास धजावत नव्हते, यामुळे टोळीचे धाडस वाढले होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. या कारवाईनंतर टोळीचे शिकार झालेले आणखी काही जण तक्रार देण्यासाठी पुढे येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Honey Trap in Nagpur on Engineer from Gadchiroli Journalists five people including the police were jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.