१०२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:47 PM2019-04-23T23:47:45+5:302019-04-23T23:48:09+5:30
जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस दलात सेवा देणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण १०२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस दलात सेवा देणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण १०२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. येत्या १ मे महाराष्ट्र दिनी त्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे.
राज्यात उल्लेखनिय व विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाते. यावर्षी राज्यातील ८०० जणांना हे सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले. त्यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल आणि दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सेवा देणारे सर्वाधिक आहेत.
सन्मानचिन्ह मिळणाऱ्यांमध्ये जिल्ह्याचे तत्पालिन अपर पोलीस अधीक्षक आणि सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले महेश्वर रेड्डी, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व सध्या उस्मानाबाद येथे जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले राजा रामासामी, जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ.हरी बालाजी यांचा समावेश आहे.
याशिवाय ३ सहायक पोलीस निरीक्षक, १६ पोलीस उपनिरीक्षक आणि ७९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एवढ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह मिळणे ही जिल्हा पोलीस दलासाठी गौरवास्पद बाब असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले.