'५० वर्षांच्या नाट्यसेवेचा ‘पद्मश्री’च्या रुपाने गौरव'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 10:34 PM2023-01-25T22:34:30+5:302023-01-25T22:35:15+5:30
Gadchiroli News गेल्या ५० वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर वावरताना पाच हजारांवर नाट्यप्रयोगांमध्ये भूमिका वठविणारे ज्येष्ठ नाट्य कलावंत, गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी परशुराम खुणे यांना ‘पद्मश्री’ किताब जाहीर झाला.
विष्णू दुणेदार
गडचिरोली / तुळशी : गेल्या ५० वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर वावरताना पाच हजारांवर नाट्यप्रयोगांमध्ये भूमिका वठविणारे ज्येष्ठ नाट्य कलावंत, गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी परशुराम खुणे यांना ‘पद्मश्री’ किताब जाहीर झाला, हे वृत्त बुधवारी रात्री धडकताच गडचिरोलीकरांचा ऊर अभिमानाने भरून आला.
खुणे यांच्या रंगभूमीवरील ५० वर्षांच्या सेवेची सरकारने ‘पद्मश्री’तून योग्य परतफेड केल्याची भावना नाट्यरसिकांमध्ये निर्माण झाली आहे. वयाच्या २१ व्या वर्षापासून रंगभूमीवर वावरणाऱ्या खुणे यांनी झाडीपट्टी रंगभूमीवरील अनेक चढ-उतार पाहिले. पूर्वी गावागावांमध्ये रात्रभर नाटकं चालायची. दुसऱ्या दिवशी दुचाकीने दुसऱ्या गावी प्रयोगासाठी सज्ज व्हावे लागत असे. दोन-दोन महिने घरीसुद्धा जाऊ शकत नव्हतो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
खुणे यांनी ८००पेक्षा अधिक नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातून व्यसनमुक्ती, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या सामाजिक नाटकांचेही योगदान दिले आहे. एकीकडे मुंबई-पुण्याकडील नाटकांचे रसिक कमी झाले, पण झाडीपट्टी रंगभूमी अजूनही टिकून आहे. ही रंगभूमी अमर राहील, असा विश्वासही खुणे यांनी व्यक्त केला.
तीन पिढ्यांमधील नाटकांचे साक्षीदार
आपल्या रंगभूमीवरील वाटचालीत खुणे यांनी तीन पिढ्यांमधील नाट्यरसिकांच्या आवडीनुसार बदलत गेलेल्या रंगभूमीला जवळून पाहिले. पूर्वी पौराणिक नाटके चालायची. नंतरच्या पिढीत सामाजिक आशयाची नाटके आली. अलीकडे मात्र थोडा बाजारूपणा आल्याची खंत व्यक्त करत, आता मनोरंजनात्मक नाटकांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
हा पुरस्कार माझ्या ५० वर्षांच्या नि:स्वार्थ वाटचालीचा सन्मान आहे. ज्या नाट्यरसिकांनी मला त्यासाठी पात्र केले त्यांच्या पायाशी मी हा पुरस्कार अर्पण करतो.
- परशुराम खुणे