७५ हेक्टरवर फळबाग लागवड
By admin | Published: May 18, 2017 01:44 AM2017-05-18T01:44:55+5:302017-05-18T01:44:55+5:30
महात्मा गांधी रोजगार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७७ शेतकऱ्यांनी ७४.६५ हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड केली आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन : रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी रोजगार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७७ शेतकऱ्यांनी ७४.६५ हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड केली आहे. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात फळ लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. एकूण क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्र धान लागवडीसाठी वापरले जाते. मात्र दिवसेंदिवस धान लागवडीचा खर्च वाढत चालला आहे. त्या तुलनेत धानाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग इतर पिकांकडे वळत चालला आहे. शेतकऱ्यांना इतर पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदानही दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वी फळबागांची संख्या अत्यंत मर्यादित होती. मात्र कृषी विभागाच्या अनुदानानंतर फळबागांची संख्या वाढत चालली आहे. फळबागेसाठी दोन ते तीन वर्ष खर्च करावा लागतो. त्यानंतर बिनाखर्ची उत्पादन मिळण्यास सुरूवात होते. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी वर्ग फळबाग लागवडीकडे वळला आहे. २०१६-१७ या वर्षात फळबाग लागवडीचे १० हेक्टरचे लक्षांक देण्यात आले होते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रती झाड अनुदान देण्यात येणार होते. पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागितले असता, ४१८ शेतकऱ्यांची अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३९० शेतकऱ्यांना तांत्रिक मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात ७७ शेतकऱ्यांनी ७४.६५ हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांनी ५ हजार ४६१ फळझाडे लावली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा, चिकू, कागदी लिंबू, शेवगा, फणस व साग या पिकांचे चांगले उत्पादन होते. प्रयोगाअंती हे सिध्दही झाले आहे.
शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केल्यानंतर त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित विभागातील कृषी सहाय्यकावर सोपविली जाते. फळबाग लागवडीवर अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनाही फळबागेची काळजी घेण्यास प्रोत्साहन मिळत आहे. दरवर्षी फळबागाची क्षेत्र वाढत चालले आहे. काही शेतकरी मात्र फळबागेतून मिळणारा अतिरिक्त नफा लक्षात घेऊन अनुदानाशिवाय फळबाग लावत आहेत.